अकोला : येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Akola APMC) व्यापारी व हमाल यांच्यामध्ये हमालीच्या दरवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अद्याप तोडगा निघालेला नसल्याने मंगळवार (३ डिसेंबर)पासून बाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत.
शेतकऱ्यांकडून दरवाढ झाली मात्र व्यापाऱ्यांकडून दरवाढ न झाल्याने हमाल कामगार संघटनेने ३ डिसेंबरपासून बंद पुकारला आहे. अकोला बाजार समितीत कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बाजार समितीच्या सभापतींकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. या विषयी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
असे दिले जातात दर
हमाल कामगारांना एका गोणी मागे ४ रुपये ३० पैसे दिले जातात, हमाल संघटनेला खरेदीदाराकडून २५ टक्के दरवाढ अपेक्षित आहे. यावरून मंगळवार (३ डिसेंबर) पासून
हमाल व कामगार संघटनेने बंद पुकारला असल्याने शेतकऱ्यांकडून आणलेल्या मालाची खरेदी - विक्री बंद करण्यात आले आहे.
ग्रेन मर्चंट असोसिएशनसोबत समन्वय साधण्याचे प्रयत्न
• ग्रेन मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटना व हमाल कामगाराच्या बंदच्या संदर्भात समन्वय घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू असून, हमाल संघटनेला दरवाढ करायची असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठवावा लागतो. तो प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे.
• दर तीन वर्षांनी दरवाढ होत असते. यंदा शेतकऱ्यांकडून ही दरवाढ झाली; मात्र खरेदीदारांकडून होणारी दरवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेने हा बंद पुकारला आहे.
जोपर्यंत दरवाढ होत नाही. तोपर्यंत हा बंद सुरूच राहणार असल्याचे हमाल कामगार संघटनेने सांगितले आहे. परंतु, तोडगा काढण्याचे प्रयत्न बाजार समिती संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे.
खरेदीदार - हमाल कामगार यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे, दरवाढीचा प्रस्ताव डीडीआर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना अडचणीत न धरता बाजार समिती सुरू करावी, असे प्रयत्न आहेत. शनिवारी बाजार समितीचे व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. - शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला