akola bajar samiti : अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ डिसेंबरपासून बंद पुकारण्यात हमाल कामगार यांनी दरवाढीच्या मुद्द्यावर संप पुकारला होता. चर्चाअंती तोडगा निघाल्यावर बाजारात शेतमालाची आवक सुरु झाली. बाजार समितीचा व्यवहार सुरळीतपणे सुरु झाला आहे.
पाच दिवसांच्या बंदनंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरू झाले आहेत. परंतु दरात अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने आवक नाही; तथापि गरजेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस प्रारंभ केल्याने मंगळवार (१० डिसेंबर) रोजी ३ हजार ५४८ क्विंटल एवढी आवक झाली.
हमाल कामगार यांनी दरवाढीच्या मुद्द्यावर संप पुकारला होता. यामुळे मंगळवार, ३ ते ८ डिसेंबरपर्यंत बाजार समिती बंद होती. सोमवार, ९ डिसेंबर रोजी बाजार समितीचे व्यवहार सुरू झाले.
पहिल्या दिवशी बाजारात सोयाबीनचे दर हे सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार रूपये होते. जास्तीत जास्त ४ हजार ३७५ रूपये तर कमीत कमी दर ३ हजार ४८५ रूपये एवढे होते. मंगळवारी सरासरी दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल ४ हजार १५० रूपये दर शेतकऱ्यांना मिळाले. परंतु जास्तीत जास्त मिळणारे दर ७५ रुपयांनी घटून ४ हजार ३०० रुपयांवर आले. कमीत कमी दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. सोमवारी ३ हजार ४८५ रूपये एवढे असणारे कमीत कमी दर मंगळवारी ३ हजार ५२५ रूपये होते.
तुरीच्या दरात अपेक्षित सुधारणा नाही!
तुरीच्या दरात अद्याप अपेक्षित सुधारणा झाली नसून, १० डिसेंबर रोजी प्रतिक्विंटल सरासरी दर ९ हजार १५० रुपये शेतकऱ्यांना मिळाले. जास्तीत जास्त दर ९ हजार ५५५ रुपये तर कमीत कमी दर ८ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना मिळाले तुरीची आवक १२६ क्विंटल एवढी होती.
मूग, उडिदाची आवक घटली!
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी मूग व उडिदाची ४ क्विटल एवढीच आवक झाली होती. उडिदाला सरासरी, जास्तीत जास्त व कमीत कमी दर ७ हजार ३२५ रुपये मिळाले. मुगाला सरासरी, जास्तीत जास्त व कमीत कमी प्रतिक्विंटल दर ५ हजार ९०० रूपये मिळाले.