अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपयांनी कांद्याची माळ विक्री केली जात आहे.
अलिबागमध्ये आलेले पर्यटक हे आवर्जून कांदा खरेदी करीत आहेत. यंदा उत्पादन गतवर्षीपेक्षा अधिक झाल्याने व्यापाऱ्यांनी सध्या पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना कांद्याचा भाव कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावांत पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबागमधील २५० हेक्टरवर
कांदा लागवड केली जाते. यंदा अवेळी पाऊस पडल्याने कांदा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र तशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. यावेळी तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कांदाही जास्त आहे.
शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे लागले डोळे
• अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारीवर्ग हा काढणीआधी शेतकऱ्याकडे येत असतो. गतवर्षी १४०० रुपये दर व्यापारी यांच्याकडून देण्यात आला होता. यावेळी ८०० ते ११०० दर दिला जात आहे.
• उत्पादन अधिक वाढले असल्याने व्यापारीवर्गाने सध्या पाठ फिरवली आहे. भाव कमी होईल, या आशेने व्यापारी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापारी येण्याकडे डोळे लागले.
छोट्या कांद्याची माळ १५०, मोठी माळ २५० रुपये
- व्यापारीवर्ग अद्याप आले नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर आपले दुकान थाटले आहे. त्यामुळे अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या कांदा विक्रीस दिसू लागला आहे. छोट्या कांद्याची माळ दीडशे, तर मोठी माळ अडीचशे रुपये दराने मिळत आहे.
- अलिबाग हे पर्यटनस्थळ असल्याने येणारे पर्यटक आवर्जून माघारी निघताना पांढरा कांदा खरेदी करीत आहेत. व्यापारी आले नसले तरी शेतकऱ्यांचा माल हा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांढऱ्या कांद्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.
तालुक्यात सुमारे २८० हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली आहे; परंतु अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. तरीही त्यावर मात करीत कांद्याची लागवड योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी प्रयत्न केले. या व्यवसायातून सुमारे दीड हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. - सतीश म्हात्रे, प्रगतिशील शेतकरी