सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या हंगामातील तिसऱ्या लिलावात तब्बल ४८९ टन बेदाण्याची आवक झाली आहे.
त्यातून २९३ टन बेदाणा एका दिवसात विकला गेला. त्यातील ६९ बॉक्स बेदाण्याला प्रति किलो ३०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव दुसऱ्यांदा मिळाला आहे.
मागील तीन आठवड्यांपासून सोलापुरात दर गुरुवारी बेदाण्याचा लिलाव होत आहे. मागील वर्षी दर कमी मिळाल्याने बेदाणा उत्पादकांना फटका बसला होता. मात्र, दिवाळीनंतर दरात हळूहळू वाढ झाली. त्यामुळे शिल्लक असलेला माल विकला गेला. फेब्रुवारी महिन्यापासून दरात आणखी वाढ झाली आहे.
पहिल्याच आठवड्यात विक्रमी ३०१ रुपयांचा भाव मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात २५० टन माल आला आणि आता तिसऱ्या आठवड्यात त्यात दुप्पटीने वाढ होऊन ४८९ टन मालाची आवक झाली आहे.
आतापर्यंत शेतकरी माल ठेवून विकत होता. मात्र, आता दर चांगला मिळत असल्याने माल सोडत आहेत. एका दिवसात २९३ टन माल विकला गेला. १९६ टन माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहे.
यंदा भाव चांगला मिळत असल्याने बेदाणा उत्पादकांना फायदा होत आहे. पुढील काही दिवसांमध्ये दर काय राहण्याची शक्यता आहे. शिवाय शेतकऱ्यांना यंदा माल कमी आहे. त्यामुळे भाव कमी होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
३०१ रुपयांचा दर
• उत्तर सोलापूरच्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील धनाजी शिंदे यांच्या ६२ बॉक्सला प्रति किलो ३०१ रुपयांचा दर मिळाला आहे.
• मागील आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळीच्या शेतकऱ्याला प्रतिकिलो २७१ रुपयांचा भाव मिळाला होता. पहिल्या आठवड्यात मात्र विजयपूरच्या एका शेतकऱ्याला ३०१ रुपयांचा दर मिळाला होता.
सरासरी दर २१० रुपये
मागील वर्षी बेदाण्याला १५० रुपयांच्या वर दर मिळत नव्हता. मात्र, यंदा सरासरी दरच २१० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उच्चांकी दर ३०१ रुपये आहे. त्यात चांगल्या प्रतिच्या मालाला २५० ते २७५ रुपयांचा दर मिळत आहे.
६ कोटी १५ लाखांची उलाढाल
तिसऱ्या आठवड्यात तब्बल ६ कोटी १५ लाख रुपयांची उलाढाल बेदाणा विक्रीतून झाली आहे. मागील आठवड्यात अडीच कोटींपर्यंत उलाढाल झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कारण, दर एकदमच वाढल्याने उलाढालही वाढत आहे.