Join us

हळदीची १० हजार कट्ट्यांची बाजारात आवक होताच; दर ५०० ने घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 11:26 AM

संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक वाढताच दर कमी

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला आठवडाभरापासून भाववाढीची झळाळी मिळत होती. ६ मे रोजी मात्र क्विंटलमागे जवळपास पाचशे ते सातशे रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. या दिवशी १० हजार कट्टे हळद विक्रीसाठी आली होती.

येथील मार्केट यार्डात पंधरवड्यापासून हळदीची विक्रमी आवक होत असल्याने काट्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत. त्यामुळे बाजार समितीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान हळदीचे बीट आणि मोजमाप करण्याचे नियोजन केले. तर शनिवार आणि रविवारी शिल्लक राहिलेल्या हळदीचे मोजमाप करण्यात येते.

४ आणि ५ मे रोजी मार्केट यार्ड बंद राहिल्यामुळे सोमवारी हळदीच्या १० हजार कट्ट्यांची आवक झाली. लवकर बीट आणि मोजमाप व्हावे, मुक्काम पडण्याची वेळ येऊ नये यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी वाहनांद्वारे हळद घेऊन रविवारीच मार्केट यार्ड जवळ केले होते. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत जवळपास एक ते दीड किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या वाहनांना रांगेत मार्केट यार्ड आवारात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर दुपारी बीट पुकारण्यात आले. यात गत आठवड्याच्या तुलनेत जवळपास पाचशे ते सातशे रुपयांनी दर घसरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३ मे रोजी हळदीला १५ ते १७ हजार, तर ६ मे रोजी १४ हजार ३०० ते १६ हजार ६०० रुपये भाव मिळाला होता. तर ६ मे रोजी मात्र भावात घसरण झाली.

भाव घसरल्याने शेतकऱ्यांत नाराजी...

■ मार्केट यार्डात सोमवारी क्विंटलमागे जवळपास पाचशे ते सातशे रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजी पुढे आली.

■ गत आठवड्यात हळदीला भाववाढीची चकाकी मिळाली होती. भाव या आठवड्यातही कायम राहील, अशी आशा होती. मात्र, भावात घसरण झाली.

हेही वाचा - काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ

टॅग्स :बाजारहिंगोलीशेतीशेतकरीपीकमार्केट यार्डमार्केट यार्ड