शासनाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी नगर तालुका बाजार समितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी वाढले. गेले दोन महिने कांद्याचे दर एक ते दीड हजारांवर होते. मागील वर्षी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे दर चार ते साडेचार हजारांपर्यंत होते. हे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्याचा परिमाण कांद्याचे दर थेट ५० टक्क्यांनी खाली आले. गेले दोन महिने कांद्याचे दर एक ते दीड हजारांच्या आसपासच फिरत होते. दर घसरल्याचा फटका गावरान कांद्यालाच बसला.
कारण जानेवारीनंतर बहुतांश गावरान कांदाचबाजारात येतो. दर कमी असल्याने शेतकऱ्यांनीही कांदा साठवणूक करण्यास सुरुवात केली त्यामुळे नगर बाजार समितीत नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये एक ते दीड लाख कांदा गोण्यांची आवक निर्यातबंदीनंतर निम्म्याने कमी झाली.
दरम्यान, रविवारी कांदा निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचा परिणाम नगर बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भाववाढीवर झाला. सोमवारी नगर बाजार समितीत ६१ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात प्रथम प्रतीच्या कांद्याला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, जो गेले दोन महिने एक ते दीड हजार एवढाच होता.