Join us

सध्या बाजारात गावरान नव्हे तर राय जांभूळाला मिळतेय पसंती; जांभूळाची बाजारात आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:36 AM

वाचा यंदा जांभळाला किती मिळतोय दर

डोंगरची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचे प्रमाण कमी होत नाही तोच जांभळांची बाजारात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे ही जांभळे घेण्यासाठी शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एका किलोसाठी ३५० रुपये मोजावे लागत आहे. परंतु, वर्षातून एकदाच जांभळे खाण्यासाठी मिळतात. त्यामुळे नागरिक पैशाचा विचार न करता ३५० देऊन किलोभर जांभळाची मनसोक्तपणे खरेदी करून त्याला मीठ लावून खाण्यावर भर देत आहेत.

जांभळाच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह भागतो, त्यामुळे अनेकांनी भटकंती करून जांभळे तोडून आणून शहरात विक्री सुरू केली आहे.

ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

गर्द जांभळ्या रंगाचा, गोड-तुरट चवीच्या आरोग्यवर्धक जांभळांची प्रत्येकालाच प्रतीक्षा असते. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर मृग नक्षत्रात जांभळाच्या झाडावर फळे येतात. पोटाच्या विकारावर जांभूळ गुणकारी आहे. त्यामुळे सध्या प्रतवारीनुसार ३५० रुपये किलोपर्यंत जांभळांची विक्री केली जात आहे. त्यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. - अलियास शेख, विक्रेता जालना.

फेरीवाल्यांकडून दारोदार विक्री : शहरात फेरीवाले जांभळांचा व्यवसाय करतात. प्रत्येक फेरीवाला दररोज सुमारे एक क्विंटल मालाची विक्री करतो. त्यामुळे शहरवासीयांना घरपोच जांभूळ खाण्यासाठी मिळत आहे. तरुण जांभळे खाण्यासाठी शेतात भटकंती करून मनसोक्त जांभळे खाण्याचा आनंद लुटतात.

जांभळा विक्रीतून उलाढाल

• जांभूळ फळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. विविध आजारांवर गुणकारी असल्यामुळे पावसाळा सुरू होताच ग्राहकांकडून मागणी वाढते. वात. कफ, पित्त अशा आजारांवर जांभळाची बी वापरण्यात येते.

• त्यामुळे जालना शहरात शेतकऱ्यांची दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यंदा जांभळांची आवक वाढली आहे. बाजारात जांभळाचा भाव ३५० रुपये किलो आहे. शहरात विविध ठिकाणी जांभळे विक्री करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात. यंदा मागील वर्षाप्रमाणेच भाव असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - जांभळाची अशी आरोग्यदायी माहिती जी या आधी नसेल वाचलेली

टॅग्स :फळेशेतकरीशेतीबाजारमराठवाडाविदर्भशेती क्षेत्रमार्केट यार्ड