बाजरीमध्ये कार्बोदके, फायबर, प्रथिने, उष्मांक, कॅलरीज, जीवनसत्व, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम या घटकांचा मुबलक समावेश असल्याने हिवाळ्यात बाजरीची भाकरी सेवन करणे फायदेशीर आहे.
गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. बाजरीचे दर गव्हापेक्षा अधिक असल्यामुळे चपातीपेक्षा भाकरीचे दर अधिक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे सांधेदुखी, सर्दी व अन्य आजार डोके वर काढतात. त्यामुळे पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.
गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. परंतु, आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे बाजरीला मागणी होत आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटाशी किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, जास्त खाणे टाळले जाते. बाजरीमुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, याचा फायदा किडनी व यकृताला होतो. बाजरीमध्ये पोळीपेक्षा कॅलरीज कमी असल्याने वजन वाढत नाही. शरीरातील स्निग्ध पदार्थांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
गव्हाचे दर किती?
बाजारात अनेक प्रकारचा गहू विक्रीसाठी उपलब्ध असून, ४० ते ४५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दर्जाप्रमाणे किमती आहेत.
बाजरीचे दर किती?
बाजरी ५० ते ६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. त्यामुळे चपातीपेक्षा भाकरी महाग आहे.
बाजरी खाण्याचे फायदे काय?
बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असल्याने रक्तदाब, हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांनासुध्दा बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बाजरीतील उष्णतेमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
वर्षातील बाजरीच्या दराचा उच्चांक
गतवर्षी ३० ते ४० रुपये किलो दराने बाजरी विक्री सुरू होती. यावर्षी ५० ते ६० रुपये दराने विक्री सुरू असून, तब्बल २० रुपयांनी दर वाढले आहेत.
थंडीमुळे वाढली बाजरीची मागणी
बाजरीच्या सेवनामुळे शरीरात उर्जा निर्माण होते, हिवाळ्यात ती फायदेशीर ठरत असल्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे.
आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, निरोगी आरोग्यासाठी सकस आहाराला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे आहारात चपातीपेक्षा भाकरीचा समावेश वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामात उपयुक्त धान्याचा वापर केला जातो. सध्या बाजरीला वाढती मागणी आहे. - सुधीर कोळवणकर