नवी दिल्ली : एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील २ लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएच यांच्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे.
याआधी सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनी या मसाल्यावर बंदी घातली आहे. या दोन ब्रँडमुळे भारतातील सर्वच मसाला निर्यातदार कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे भारताची मसाला निर्यात ५% घटली आहे.
मसाले दीर्घकाळ टिकावेत यासाठी स्टरलायझेशन प्रक्रिया करून मसाल्यांत एथिलिन ऑक्साइड (ईटीओ) मिसळले जाते. एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांत ईटीओचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे भारतीय मसाल्यांबाबत जगभरात प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे.
'फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेक होल्डर्स'चे चेअरमन अश्विन नायक यांनी सांगितले की, भारतातून दरवर्षी चार अब्ज डॉलरचे मसाले निर्यात होतात. मसाले सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वच देशांत ईटीओचा वापर केला जातो. मात्र त्याचे प्रमाण भिन्न असते.
ईटीओ हे मानवी प्रकृतीसाठी हानिकारक नाही. मुळात ईटीओ हे कीटकनाशक नाही. भारतीय मसाले निर्यात बोर्डाने यावर काही तरी पावले उचलायला हवीत. भारताचे मसाले १७० देशांत निर्यात होतात.
ब्रिटनमध्ये अतिरिक्त सतर्कता
ब्रिटनचे खाद्य नियामक 'फूड स्टँडर्ड ऑथॉरिटी' ने एक आदेश जारी करून भारतीय मसाल्यांची तपासणी वाढवली आहे. ब्रिटनमध्ये येणाऱ्या सर्व भारतीय मसाल्यांची आता कीटकनाशक अंश चाचणी केली जाईल.
कॅन्सरचा धोका?
नेपाळचेअन्न तंत्रज्ञान व गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, एथिलिन ऑक्साइडमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर नेपाळ सरकारने सात दिवसांची बंदी घातली आहे.
अधिक वाचा: Ragi Processing नाचणी पासून कसे कराल पौष्टिक प्रक्रियायुक्त पदार्थ