स्वप्नील इंगळेयावर्षी केळी उत्पादनात घट झाली असली तरी श्रावण महिन्यात बाजारात मागणी वाढली आहे. सद्य:स्थितीत केळीला प्रतिक्विंटल १२०० ते १४०० रुपये दर मिळत आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, गत एप्रिल ते मे महिन्यात केळीला दोन हजारांवर दर मिळत होता.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा परिसर हा बागायती क्षेत्र आहे. बहुतांश शेतकरी केळीच्या पिकांला पसंती देतात. उमरा परिसरात जुलैमध्ये व ऑगस्टमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी केळी लागवड केली आहे. मागील वर्षी केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांची केळी आता कटाईसाठी आली असून, सद्य:स्थितीत श्रावणमासाची पर्वणी सुरू आहे. भाविक उपवास धरत असल्याने केळीची मागणी वाढली आहे. केळीचे भाव सर्वसाधारण १२०० ते १४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे भाववाढ होत असताना पावसामुळे केळीचे अपेक्षित उत्पन्न कमी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा कमी प्रमाणात होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.
सण-उत्सवामुळे दर वाढणार!गत आठवड्यात सर्वसाधारण केळीला १००० ते १२०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. श्रावण महिना सुरु असल्याने केळीचे दर वाढले आहेत. पुढील महिन्यात सण-उत्सव असल्याने केळीच्या भावात चांगलीच वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
केळीचा उत्पादन खर्च वाढलाकधी अवकाळी पाऊस, कधी चक्रीवादळ, तर कधी केळीच्या दरात घसरण होत आहे. अशा अनेक संकटांची मालिका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे सातत्याने येत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच त्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या केळी पिकावर होणारा वाढता खर्च पाहता, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळीचा उत्पादन खर्चही निघत नाही.
यावर्षी केळीला जास्त खर्च ही झाला व भाव मिळत आहे. मात्र, मागील महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. - गणेश काळे, शेतकरी, लाडेगाव
यावर्षी सुरुवातीपासून केळीला चांगला भाव मिळत आहे व पुढच्या महिन्यात सण-उत्सव असल्याने केळीचे भाव चांगलेच राहतील. - प्रवीण ठाकरे, व्यापारी, पांढरी
यावर्षी चांगल्याप्रकारे भाव मिळत आहे. परंतु, पावसाने दगा दिल्याने केळी रासमध्ये कमाची घट बसत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. - प्रवीण भगत, पिंप्री जैन