Join us

Banana Market दांडेगावच्या केळीला परदेशात मागणी; पण भावच मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:28 AM

दांडेगाव व परिसरातील केळीला राज्यासह परदेशांतही मागणी मिळू लागली असली तरी भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शासनाने इतर शेतीमालांबरोबर केळीलाही भावाच्या बाबतीत चांगला दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

विश्वास साळुंके

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव व परिसरातील केळीला राज्यासह परदेशांतही मागणी मिळू लागली असली तरी भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शासनाने इतर शेतीमालांबरोबर केळीलाही भावाच्या बाबतीत चांगला दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, सालापूर, डिग्रस, डोंगरकडा, जवळा पांचाळ, सुकळी आदी भागांत केळीचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. गतवर्षी केळीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी आनंदी झाले होते; परंतु खर्चाच्या मानाने यावर्षी केळीला भाव म्हणावा तसा मिळत नाही.

त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गतवर्षी दांडेगाव व परिसरातील केळीला इराण, दुबई आदी ठिकाणांहून मागणी आली होती. त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी काही एक विचार न करता केळीला इतर देशांत पाठवून दिले.

गतवर्षीपेक्षा यावर्षी चांगला भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले होते; परंतु यावर्षी अपेक्षेपेक्षा निम्माच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून दांडेगाव व परिसरातील शेतकरी केळीची लागवड करीत असतात. कधी ना कधी तरी केळीला भाव चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

या आशेवर शेतकऱ्यांनी याहीवर्षी मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली असून, व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करून ठेवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केळीला भाव मिळेल, या आशेवर लाखो रुपये खर्चही केला आहे. यावर्षी केळीला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. तर परदेशामध्ये निर्यात करण्यात येत असलेल्या केळीला १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे दर मिळत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शासनाने केळी पिकाकडेही लक्ष द्यावे

स्थानिक व्यापारी हे त्यांची एकजूट करून दर वाढू देत नाहीत, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या भागामध्ये दोन हजार रुपयांवर दर मिळत आहेत. केळीसाठी देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या मध्य प्रदेशातील बुहाणपूर बाजारपेठेतही केळीला चांगले दर मिळत आहेत. केवळ स्थानिक व्यापारी हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. - बाळासाहेब नरवाडे, शेतकरी, डोंगरकडा.

लहान लेकरांप्रमाणे केळीचे संगोपन करावे लागते. त्यासाठी वेळोवेळी खते, औषधी, सूक्ष्म अन्नद्रव्ये, फवारणी अथवा 'ठिबक'द्वारे पाणी द्यावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो; परंतु त्यामानाने केळीला दर काही मिळत नाही. - मंचक साळुंके, शेतकरी, दांडेगाव.

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :केळीहिंगोलीशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारफळे