किरण चौधरी
नवरात्रौत्सव असूनही केळी भावात वाढ न होता त्यात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३१०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळी भाव आता चक्क २३०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आठवडाभरात केळीचे भाव पुन्हा उसळी घेण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त उपवास असतात. यामुळे केळीच्या मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात केवळ जामनेर, चोपडा व लगतच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यात केळी मालाची उपलब्धता आहे. या संधीचा फायदा घेत व्यापा-यांनी दर्जेदार केळी मालाची साठवणूक केली आहे.
केळीची आवक कमी झाली आहे. यामुळे केळीचे भाव २३०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. उत्तर प्रदेशातील केळी मालाची उपलब्धता येत्या आठवडाभरात संपण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील चक्राकार पद्धतीने लागवड केलेल्या दर्जेदार केळीला पूर्ण भाव, तर संपुष्टात आलेल्या नवती बागांमधील जेमतेम उरल्यासुरल्या केळीमालाच्या प्रतवारीनुसार भाव मिळत आहे. मालाची आवक कमी असताना भाव खाली आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जामनेर तालुक्यात २७०० रुपये, तर बऱ्हाणपूर जिल्ह्यात २३०० पर्यंत केळीचे भाव सुरू आहेत. केळी निर्यातीला सध्या उतरती कळा असली तरी जम्मू आणि काश्मीरकडे केळी मालाची मागणी वाढली आहे. - डॉ. अनुप पाटील, केळी निर्यातदार, अजनाड.
सध्या केळीचे भाव घसरले असले तरी आठवडाभत पुन्हा 'जैसे थे होतील, अशी अपेक्षा आहे. - विशाल अग्रवाल, रावेर.
सध्या केळीची आवक कमी होऊनही भाव मात्र कमी होत आहेत. हे पहिल्यांदाच घडले असावे. व्यापाऱ्यांची मनमानी कुठेतरी थांबायला हवी. - रामचंद्र पाटील, केळी उत्पादक शेतकरी, गाढोदा, ता. जळगाव.