केळीची घड काढणीचा कालावधी जून महिन्यापासून सुरुवात होतो. यंदा मात्र जून महिन्याच्या अगोदरच केळीचे घड काढणीस सुरुवात झाली. मात्र केळीला भाव काही मिळाला नाही. तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर केळीच्या दरात वाढ झाली होती.
चांगल्या दर्जाच्या केळीला प्रतिक्विंटल २३०० रुपये दर मिळत आहे. हा दर एक आठवडासुद्धा राहिला नाही. पुन्हा दरात घसरण झाली असून शेतकऱ्यांना यंदा मात्र केळीच्या दरात चढ उतार होताना डोकेदुखी ठरली आहे.
नैसर्गिक संकट पाणी टंचाई व लागवडीपासून खूप खर्च करून जतन केलेल्या केळीला तुटपुंजा भाव मिळाला होता. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु श्रावण महिन्यापासून केळीच्या दरात सुधारणा झाली आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका व परिसर हा केळीसाठी राज्यासह देशभरात ओळखा जातो. गत वर्षी झालेला पाऊस व इसापूर धरणातून मिळालेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली होती. तापमानामुळे काही प्रमाणात केळीच्या बागावर परिणाम झाला. शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून मळ्याची जोपासना केली. मात्र मे महिन्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला.
नंतरच्या काळात केळीच्या मळ्यात सुधार झाला. मात्र काढणीचा हंगाम सुरू झाला आणि दरात मोठी घसरण झाली. मे महिन्यात १६०० ते १७०० भाव राहिला.
शेतकऱ्यांना दिलासा
• जून महिन्यात आणखी घसरण होऊन १५०० ते १६०० रुपये प्रतिक्चिटल भाव झाला. जुलै महिन्यात आणखी दर घसरले. १२०० ते १४०० प्रतिक्चिटल भाव आला.
• जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर दरात मोठी पडझड झाली असून १००० ते १२०० भाव मिळाला. परंतु ऑगस्ट महिन्यात चांगली सुधारणा झालेली दिसत आहे.
• चांगल्या दर्जाच्या केळीला २३०० रुपये प्रतिक्विंटल तर मध्यम दर्जाच्या केळीला १६०० ते १८०० रुपये तर लोकलमध्ये जाणाऱ्या केळीला १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दोन, तीन महिन्यात दर कवडीमोल
केळी काढणीचा कालावधी तीन ते चार महिने असतो. दोन ते तीन महिन्यात केळीला दर कवडीमोल मिळाला होता. मागील एक महिन्यापासून केळीला चांगला भाव मिळत आहे. मात्र हा भाव सरते वेळी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.