Join us

केळीचे दर गडगडले; केवळ आठशे रुपये प्रतिक्विंटल मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 9:33 AM

शेतकऱ्यांना बसू लागलाय फटका

केळीच्या बागा अधिक प्रमाणात सुरू होताच केळीचे दर गडगडले आहेत. आठ दिवसांपूर्वी केळीला प्रतिक्विंटल १६०० रुपयांचा दर मिळत होता; परंतु आज केळीचा दर आठशेवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन व कापूस या पिकानंतर केळीनेही सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना चिंतेत पाडल्याचे दिसत आहे.

वसमत तालुक्यात केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असून वसमतची केळी दुबई, अफगाणिस्तान आदींसह इतर देशांतील कानाकोपऱ्यात पोहोचत असते. आठ दिवसांपूर्वी केळीला प्रतिक्विंटल १ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. राज्यात वसमत तालुक्यासह तुरळक ठिकाणी केळी बागा असल्याने केळीचे दर वाढून मिळत होते. सध्या सोलापूर, बुऱ्हाणपूर व आंध्र राज्यातील केळी बागा सुरू होताच तालुक्यातील केळीचे दर गडगडले आहेत.

आठ दिवसांपूर्वी १ हजार ६०० रुपयांचा दर मिळात होता. अधिक प्रमाणात बागा सुरू होताच केळी प्रतिक्विंटल आठशे रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळी बागांचे नुकसान झाले, आता दराचा फटका बसत आहे.

केळीचे दर कमी झाले... तालुक्यासह काही ठिकाणांवरील केळी बागा सुरू होत्या. त्यामुळे केळीला आठ दिवसांपूर्वी १ हजार ६०० पर्यंत दर मिळत होता. आता सोलापूर, बुहाणपूर व आंध्र प्रदेश राज्यातील केळी बाजारात येत आहेत. त्यामुळे केळीचे दर कमी झाले आहेत. - असद शेख नूर, व्यापारी, वसमत

वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका; आता दरही पडले...

■ एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा मोठा फटका केळी बागांना बसला आहे. त्यामुळे केळी बागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आधी दर चांगले मिळत होते.

■ आता अवकाळीचा फटका असला असून दरही गडगडले आहेत. सद्यःस्थितीत केळीला प्रतिक्विंटल ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे हे खर्चाच्या मानाने परवडणारे नाही, असे तालुक्यातील शेतकयांनी सांगितले. परिणामी शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे.

मिळणारे दर न परवडणारे... केळी बागाला लागवड खर्च भरपूर लागतो. त्यामुळे केळीला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. केळीचे दर किमान १ हजार ५०० रुपयांपर्यंत थोडेफार परवडणारे आहेत. आठशे रुपयांच्या दरात लागवड खर्च देखील निघणे कठीण आहे. - राजू आसोले, शेतकरी

हेही वाचा - पशुपालकांनो सावडीनुसार नको; जनावरांच्या पाण्याचे असे असावे काटेकोर नियोजन

टॅग्स :केळीशेतकरीशेतीहिंगोलीबाजार