Join us

केळीचे ७०० पर्यंत घसरलेले दर आता वधारले; वाचा काय मिळतोय सध्या दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 9:21 AM

केळीचे दर वधारल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

गेल्या महिन्यात ७०० रुपयांवर आलेले केळीचे दर आता पुन्हा वधारल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आंध्र प्रदेश भागात केळीच्या बागा कमी झाल्या असून, केळी संपत आली आहे. त्यामुळे स्थानिक केळीला मागणी वाढली आहे. परिणामी, भाव वधारले आहेत. पावसाळा सुरू होताच दर आणखी वधारण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहेत. तालुक्यातील दर्जेदार केळी देशासह इरान, दुबई यासह अन्य देशांत गेली आहे. गतवर्षी केळीला सर्वाधिक २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.

एप्रिल महिन्याअखेर केळीचे दर गडगडले होते. ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आंध्र प्रदेश व राज्यातील केळीबागा कमी होताच केळीच्या दरात तेजी आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे केळी बागा आहेत त्या शेतकऱ्यांनी दर कमी मिळत असल्याने बागांची कापणी बंद केली आहे.

त्यामुळेही दरात तेजी येत आहे. पावसाळा काही दिवसांवर आहे. पावसाळ्यात आंबा कमी होत जातो व केळीची मागणी वाढते, असे होताच केळीचे दर वाढतील, असे दिसून येत आहे. सध्या दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पूर्वीच्या तुलनेत केळी बागा झाल्या कमी

वसमत तालुक्यातील केळी बागा कमी झाल्या आहेत. पावसाळ्यात केळी बागा काढण्यास येतील. आंध्रातील केळी कमी झाली आहे. त्यामुळे केळीची मागणी वाढली आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर केळीस मिळत होता. सध्या केळीला १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला आहे. - असद शेख नूर, व्यापारी, वसमत.

दर कमी मिळतो, उत्पन्न खर्च कसा निघेल

अलीकडच्या काळात केळीचे दर आवकवर आधारित राहत आहे. त्यामुळे उत्पन्न खर्च काढणेही कठीण झाले आहे. २० दिवसांपूर्वी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. तर सध्या १४०० दर मिळत आहे. पडत्या भावात जवळपास एक ते दीड हजार बागांची विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. - कामाजी सिद्धेवार, शेतकरी.

हेही वाचा -  स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :फळेबाजारशेतकरीशेतीहिंगोलीशेती क्षेत्र