Join us

शेतमालाच्या भावातील चढ-उतार यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत ही योजना सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:09 PM

शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतकऱ्यांना जादा दर मिळू शकतो.

बारामती : शेतकऱ्यांचा शेतमाल काढणी हंगाम चालू झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने शेतमालाचे बाजारभाव खाली येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतकऱ्यांना जादा दर मिळू शकतो.

या दृष्टिकोनातून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन मंडळाने केलेल्या सूचना विचारात घेऊन दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२०२५ या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.

या शेतमाल तारण कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत बाजरी, गहू, ज्वारी, उडीद, सोयाबीन इत्यादी शेतीमाल स्वीकारला जाईल.

यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्ती लागू राहतील. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यास ठेवलेल्या शेतीमालावर हमीभावाप्रमाणे किंवा चालू बाजारभावानुसार किमतीचे ५० ते ७५ टक्के कर्ज दिले जाईल.

सदर तारण कर्ज बाजार समिती मार्फत द.सा.द.शे. ३% व्याजाने धनादेशाद्वारे सहा महिने मुदतीकरिता दिले जाईल.

यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा त्यावर चालू हंगामातील पीक नोंद, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, मोबाइल नंबर इत्यादी कागदपत्रे कार्यालयात जमा करावयाची आहेत.

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीपीकबाजारमार्केट यार्डबारामतीकृषी योजना