Join us

बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 11:02 AM

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.

त्यानुसार केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत मूग, उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारामतीसाठी मंजूर झाले आहे.

त्याकरिता शेतकरी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली. या केंद्रावर नाफेडमार्फत सोयाबीन प्रति क्विंटल रुपये ४८९२, उडीद रुपये ७४०० आणि मूग रुपये ८६८२ प्रति क्विंटल या हमीदराने शासन खरेदी करणार आहे.

सध्या मूग, उडीद व सोयाबीन काढणी हंगाम सुरू झाला असून बाजार आवारात नवीन शेतमालाची आवक सुरू झाली आहे. बाजार आवारात मागणी व पुरवठा यानुसार दर निघतात.

वाळलेला व स्वच्छ सर्वसाधारण दर्जाचा माल हमीदराने विक्रीची सोय करावी म्हणून बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती. हे केंद्र सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.

या केंद्रावर शेतकऱ्यांनी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी जो शेतमाल विक्री करावयाचा आहे यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी जो शेतमाल विक्री करावयाचा आहे त्याची नोंद असलेला सन २०२४-२५ पीकपेऱ्यासहीत सातबारा उतारा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

शासनाने दिलेल्या कालावधीनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघात प्रशांत मदने यांच्याकडे नाव नोंदणी करावयाची आहे. मुख्य यार्ड येथे प्रत्यक्ष खरेदी केंद्र ऑनलाइन नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल १५ ऑक्टोबरपासून समितीचे यांत्रिक चाळणी येथे खरेदीस सुरुवात होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाच्या निकषाप्रमाणे एफ.ए.क्यू दर्जाचा, स्वच्छ आणि वाळवून आणावा असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :सोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डबारामतीसरकारराज्य सरकार