पुणे : महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचेमार्फत कृषि उत्पन्न बाजार समिती बारामतीच्या जळोची उपबाजारात उभारण्यात आलेल्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे उद्घाटन ८ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे करण्यात आले.
फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट (मॅग्नेट) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळने बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राची उभारणी केली.
सदर सुविधा केंद्रामध्ये कोल्ड स्टोरेज, प्रिकुलींग युनिट, पॅक हाऊस, द्राक्ष, केळी व डाळिंबासाठी ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग लाईन, फ्रोजन फ्रूट स्टोरेज, ब्लास्ट फ्रिजर, सोलर सिस्टीम, फायर फायटिंग व सोलर सिस्टिम, मटेरिअल रिसिविंग व डिसपेंच एरिया, स्वच्छता गृह, कॅन्टिन व निवास व्यवस्था, पॅकिंग मटेरिअल स्टोरेज, टेस्टिंग लॅब इत्यादी सुविधा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी व संबधित घटकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच येथे ३०० के.व्हि. क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभा केला असल्याने प्रकल्पाचे विद्युतबिलामध्ये मोठी बचत होणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास वारामती बाजार समितीचे सर्व सदस्य, मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे, उपसंचालक डॉ. अमोल यादव व कृषि पणन मंडळाचे इतर अधिकारी उपस्थित होते.