बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही मंचरबाजार समितीत रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे, प्रतिक्विंटल तीन हजार ते तीन हजार ५०० असा भाव बटाटा वाणाला आहे.
मात्र, त्याला अपेक्षित मागणी नाही. वातावरणातील बदल आणि वाढलेल्या भांडवली खर्चामुळे शेतकरी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवत आहे. यंदा राज्यात भरपूर पाऊस होऊनही बटाटा वाणाच्या मागणीत गत तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे.
या वर्षी पुणे जिल्ह्यात बटाटा हंगाम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. नव्या बटाट्यास चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने तरुण शेतकरी वर्गाकडून बटाटा लवकर बाजारात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आगाद लागवड होत आहे.
आठ-दहा वर्षांत शेतकऱ्यांना कांदा हे हमखास पैसे मिळवून देणारे पीक घेण्यासाठी जमिनीच्या चांगल्या बेवडसाठी आणि इतर ठिकाणच्या बटाटा उत्पादकांपेक्षा येथील बटाट्यास जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने, लवकर बटाटा लागवड करून राज्यातील व देशातील इतर भागातील लागवडीच्या आधी आपलेच बटाटा पीक बाजारात आणण्यासाठी हंगाम पूर्व बटाटा लागवड गेल्या काही वर्षात वाढली आहे.
त्यामुळे बेभरवशाच्या वातावरणात हवामान बदलाचा धोका पत्करून या कालावधीत उत्पादन कमी येत असूनही या भागात बटाटा लागवडीकडे तरुण शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
बटाट्याचे आगार समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा व संगमनेर, अकोला, पारनेर या पश्चिम नगर जिल्ह्यात बटाटा पिकात अलीकडे मोठी घट झाली आहे, अशी माहिती मंचर बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
२०२० पेक्षा वाजवी भाव
■ मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाणाचे भाव मोठी साईज गोळी बटाटा ३००० पासून लहान साईजचा बटाटा ३५०० पर्यंत प्रति क्विंटल असा आहे. पंजाबचे कमी प्रतीचे व इतर राज्यातील बटाटा गोळी वाणाचे दर २६०० ते २९०० प्रति क्विंटल असे आहेत.
■ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील कोल्ड स्टोअरमधील बटाटा राज्यातील बाजारपेठेत येत असून, किरकोळ बाजारात उपलब्ध होत असलेल्या बटाट्याच्या भावाच्या मानाने येथील बाजार- पेठेत या वर्षीचे बाजारभाव २०२० पेक्षा अतिशय वाजवी आहेत. तरीही मंचर बाजार समितीत बटाटा वाणास मागणी अतिशय कमी आहे.
विक्री वाढण्याची शक्यता
सहा-सात राज्यांत व महाराष्ट्रातही कांदा पीक घेण्याकडे प्रचंड ओघ असल्याने बटाट्याचे सध्याचे चढे किरकोळ विक्रीचे बाजारभाव भविष्यात टिकून राहतील, देशात पुढील काही महिने नवा बटाटा बाजारात येण्यास विलंब होणार असल्याने बटाट्याचे भाव दीर्घकाळ टिकून राहतील व बटाटा पिकास चांगला भाव मिळत राहणार आहे. या वर्षी पर्जन्यमान चांगले राहिले आहे. राज्यात शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध असल्याने या वर्षी दसरा ते डिसेंबर अखेरपर्यंत बटाटा वाणास मराठवाडा, पश्चिम विदर्भ व खानदेश व संभाजीनगर आणि नगर जिल्ह्यातील मार्केटमध्ये भाव वाढून एकूण बटाटा विक्री वाढेल, अशी शक्यता दिसत असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सदस्य व आइत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संजय मोरे यांनी दिली.
नवा बटाटा येण्यासाठी जास्त कालावधी लागणार
● वीस पंचवीस वर्षांपासून सुधारित जातीचे पुखराज बटाटा वाण सर्वत्र वापरले जात आहे. कारण हे वाण कमी दिवसांत तयार होऊन इतर वाणांपेक्षा भरपूर उत्पन्न येते. या वर्षी भारतात कांद्याप्रमाणे बटाटा भाव वाढल्याने बटाटा वाणाचे दर जास्त आहेत व बटाटा लागवडीचे भांडवलावर मोठा खर्च होणार असल्याने शेतकऱ्यांची उत्सुकता कमी आहे.
● मान्सून लांबल्याने तसेच परतीचा पाऊस अद्याप पडत असल्याने बटाट्यानंतर कांदा पीक किंवा इतर पिकांना उशीर होईल या सर्व कारणांमुळे मंचर बाजारपेठेत अतिशय कमी मागणी आतापर्यंत दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील इंदोर परिसरात लवकर हंगामात लावलेला बटाटा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नष्ट झाल्याने बटाटा उत्पादन घटले आहे व खरीप हंगामातील शेतकरी अडचणीत आहेत.
● रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील आतापर्यंतची आगाद बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात घटल्याने संपूर्ण देशात नवा बटाटा बाजारात येण्यास मोठा वेळ जाईल. यामुळे महाराष्ट्रातील अल्प प्रमाणात लागवड झालेल्या बटाटा उत्पादकांना चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पोखरकर यांनी दिली.