विठ्ठल खेळगी सोलापूर: मागील वर्षी झालेल्या पावसामुळे बेदाण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. मार्च व एप्रिलमध्ये दर नव्हता. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल, म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवला.
मात्र, सहा महिन्यांनंतर दरात काय वाढ होईना, उलट दिवसागणीत दरात घसरणच होत आहे. आता ऑक्टोबर छाटणीला पैशांची गरज असल्याने शेतकरी मिळेल त्या दरात बेदाणा विक्री करीत आहेत. एप्रिलमध्ये १७० रुपये किलो दर मिळत होता आणि मात्र, सरासरी १४० ते १५० रुपये भाव आहे.
बेदाणा लिलावासाठी तासगाव, सोलापूर, पंढरपूर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात माल येतो. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्यासाठी स्वतंत्र मार्केट सुरू करण्यात आले आहे सध्या दर गुरुवारी बेदाणा लिलाव होत आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला बेदाण्याचा दर तीनशे रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे यंदा बेदाण्याला मोठी मागणी असेल, असे वाटत होते. मात्र, मागील काही महिन्यांत दर पडला आहे. सध्या सरासरी १४० ते १५० रुपयांचा दर मिळत आहे.
विशेष करून मागील वर्षीचा माल आता विकला जात आहे. सध्या तासगाव, पंढरपूर, विजयपूर, सोलापूर व सांगली येथील सर्व कोल्ड स्टोरेज सध्या फुल्ल आहेत.
मात्र, आता पुढे भाव वाढण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी माल विक्रीला काढत आहे. चालू आठवड्यात काही मालाला २११ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. मात्र, सरासरी दर १४० ते १५० रुपयेच आहे.
जादा दरात खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनाही फटकानवीन बेदाणा मार्केटमध्ये आल्यानंतर व्यापाऱ्यांनी १७० रुपयांप्रमाणे खरेदी केली. आता दर वाढतच झाल्याने व्यापाऱ्यांना घेतलेल्या दरांपेक्षा २० ते ३० रुपये कमी किमतीत विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
माल ठेवल्याचा शेतकऱ्यांना तोटाएप्रिल व मे महिन्यात जवळपास १७० ते १८० रुपये दर मिळत होता. मात्र, दिवाळीच्या तोंडावर २५० रुपयांपर्यंत मिळण्याची आशा होती. दर वर्षी दिवाळीच्या दीड ते दोन महिने अगोदर दरात वाढ होते. मात्र, सध्या वाढ होण्याऐवजी दरात घसरणच होत आहे. त्यामुळे माल ठेवल्याचा शेतकऱ्याना तोटाच झाल्याचे दिसून येत आहे.
अद्यापही ५० टक्के बेदाणा पडूनच आहे. दिवाळीच्या तोंडावरही दर वाढण्याची शक्यता कमीच आहे. आता ऑक्टोबर छाटणीला आणि त्यानंतर औषध फवारणीला पैसे लागतात. शेतकरी मिळेल त्या दरात माल सोडत आहेत. - शिवानंद शिंगडगाव, बेदाणा व्यापारी, सोलापूर