Join us

Bedana Market : पंढरपूर बाजार समितीत गोल्डन रंगाच्या बेदाण्याला आजपर्यंतचा सर्वाधिक दर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:19 IST

जाधववाडी (ता. पंढरपूर) येथील नवनाथ तुकाराम कोरडे हे मागील अनेक वर्षांपासून बेदाणा विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन येत होते.

पंढरपूर : जाधववाडी (ता. पंढरपूर) येथील एका बेदाणा उत्पादकाच्या गोल्डन रंगाच्या बेदाण्याला आजपर्यंतचा सर्वाधिक असा प्रति किलो साडेसहाशे रुपये दर मिळाला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश गायकवाड यांनी सांगितले.

जाधववाडी (ता. पंढरपूर) येथील नवनाथ तुकाराम कोरडे हे मागील अनेक वर्षांपासून बेदाणा विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन येत होते. यावेळी त्यांना विशाल मर्दा मार्गदर्शन करत होते. त्यानुसार त्यांनी शेतात विविध प्रकारे सुधारणा केली.

मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणाऱ्या बेदाणा बाजारात २०० गाडीच्या आसपास आवक झाली आहे. या दिवशी नवनाथ तुकाराम कोरडे यांनी अडते विशाल मर्दा यांच्याकडे २५ बॉक्समध्ये ३७५ किलो बेदाणा आणला.

यावेळी या बेदाण्यांच्या बोलीमध्ये बेदाणा व्यापारी एम सरडा (सांगली) यांनी ६५० रूपये किलोने मागणी केली. या व्यवहारातून २ लाख ४३ हजार ७५० रुपयांच्या आसपास रक्कम मिळणार आहे.

मात्र मंगळवारी दिवसभरात एकूण ५० कोटीच्या आसपास उलाढाल झाली आहे. शेतकऱ्याला जादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी तोफा, फटाके उडवून, पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला आहे. 

यावर्षी बेदाण्याचे ५० टक्केच उत्पादन झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा उतारा तीन टन निघायचा परंतु सध्या उत्पादन कमी होत आहे. असे असले तरीही उत्तम दर्जाचा माल तयार होत आहे. यामुळे सध्या मार्केटमध्ये बेदाण्याचा भाव वाढला आहे. - विशाल मर्दा, आडत व्यापारी

अधिक वाचा: Devgad Hapus : आता देवगड हापूस ओळखणं होणार सोपं; ५० लाख बारकोडचे वितरण

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीमार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपंढरपूर