विठ्ठल खेळगी
सोलापूर : यंदाच्या वर्षी बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याने सरासरी दर दीडशे रुपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे राज्यात सुमारे दोन लाख मे. टन बेदाणा अद्याप पडूनच आहे.
सोलापूर, पंढरपूर, तासगाव, सांगलीतील कोल्ड स्टोरेज सध्या फुल्ल आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावरच दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. बेदाणा लिलावासाठी तासगाव, सोलापूर, पंढरपूर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात माल येतो.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्यासाठी स्वतंत्र मार्केट सुरू करण्यात आले आहे. सध्या दर गुरुवारी बेदाणा लिलाव होत आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला बेदाण्याचा दर तीनशे रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे यंदा बेदाण्याला मोठी मागणी असेल असे वाटत होते. मात्र मागील काही महिन्यात दर पडला आहे.
सध्या सरासरी १३० ते १४० रुपयांचा दर मिळत आहे. विशेष करून मागील वर्षीचा माल आता विकला जात आहे. यंदाचा माल अद्यापही पडूनच आहे. अशीच परिस्थिती तासगाव, सांगली आणि पंढरपूरमध्येही आहे.
मागील वर्षी बेदाण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे तासगाव, पंढरपूर, विजयपूर, सोलापूर व सांगली येथील सर्व कोल्ड स्टोरेज सध्या फुल्ल आहेत. जोपर्यंत दर वाढत नाही. सरासरी अडीचशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत दर मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी माल सोडणार नाही. त्यामुळे कोल्ड स्टोरेजमधील बेदाणा पुढील वर्षापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
दुबई, तुर्कीमधूनही मागणी घटली
महाराष्ट्रातील बेदाणा दुबई, इराण, तुर्की राज्यांमध्ये निर्यात केला जातो. मात्र त्या ठिकाणीही यंदा बेदाणा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांच्याकडील ही मागणी आता घटली आहे. पुढील काही महिन्यात निर्यात वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.
सध्या बेदाण्याला दर नसल्यामुळे शेतकरी माल विकायला तयार नाही. त्यामुळे सर्व कोल्ड स्टोरेज सध्या फुल्ल आहेत. जवळपास २० हजार गाड्या माल तासगाव, सांगली, पंढरपूर, सोलापूर, विजयपूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये आहे. दिवाळी सणामध्ये काही प्रमाणात मागणी वाढण्याची शक्यता आहे. - शिवानंद शिंगडगाव, बेदाणा व्यापारी, सोलापूर