सांगली तासगाव बेदाणा असोसिएशनने दि. ३० ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे शून्य पेमेंटसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीदारांनी महिन्यात व्यवहार पूर्ण करावेत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी केले आहे. देणे-घेण्याचा हिशोब पूर्ण झाल्यानंतर दि. २७ नोव्हेंबरपासून नवीन बेदाणा सौदे सुरू होणार आहेत, असेही कंभार म्हणाले.
बेदाण्याची वर्षाला कोट्यवधीची उलाढाल होते. यापूर्वी अनेक व्यापारी आडते आणि शेतकऱ्यांना बुडवून पळून गेले आहेत. त्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने दिवाळीत झिरो पेमेंट हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक व्यापारी थकबाकीमुळे चिंतेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या उपक्रमांमध्ये अडत्या व व्यापाऱ्यांनी आपापले पैसे एक महिन्याच्या सुटीमध्ये येणे-देण्याचा हिशोब पूर्ण करण्याचा नियम आहे. त्याची यादी सांगलीतील पूजा ट्रेडर्स आणि तासगावमधील गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये सादर करावी.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शून्य पेमेंट करायचेच, असा निश्चय करीत दि. ३० ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरअखेर सौदे बंद असणार आहेत.