पान, विड्याला कात चुना लावल्याशिवाय पानाचा विडा रंगत नाही; परंतु सणासुदीमुळे कात चुना लावल्याविनाच पानाचा विडा रंगला आहे. मागणी वाढल्याने नागवेली पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, यामुळे तरी शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे.
श्रावण महिन्यापासून सणासुदीला सुरुवात झाली असून, पोळा सणाला पानाला चांगली मागणी होती. आता तर गणेशत्सवाला सुरुवात झाल्यापासून आणखी मागणीत वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांनंतर गौरी महालक्ष्मी सण येणार आहे.
या दिवशी नागवेली पानाला अतिमहत्त्वाचे स्थान असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागणी शक्यतो मोठ्या प्रमाणात असल्याने पान उत्पादक शेतकरी पानाची तोडणी करीत आहे. मागील आठवड्यात मागणी वाढल्याने पानाच्या दरात सुधारणा झाली आहे.
आणखी दर वाढण्याची शक्यता
उन्हाळ्यात तापमान आणि अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे पानाचे नुकसान झाले आहे. यामुळे पुढील येणाऱ्या सणाला पानाचे दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. पोळा सणाला दहा ते पंधरा लाखांची तोडणी झाली असून, महालक्ष्मीला वीस ते पंचवीस लाखांची तोडणी होईल.
अतिवृष्टीतून पानमळे वाचले
• मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांना फटका बसला असून, नागवेली पान मळ्याला अपवाद राहिला नाही. थोड्याफार प्रमाणात नागवेली मळ्यांनाही अतिवृष्टीचा फटका आहे; परंतु पानाला मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला आहे.
• नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील चाभरा गावातील अनेक शेतकरी पानमळ्याचीशेती करतात; परंतु सतत होणाऱ्या अस्मानी संकटामुळे येथील शेतकऱ्यांनी नागवेली पान- मळ्याकडे पाठ फिरवली आहे.
• काही बोटावर मोजता येतील एवढेच मळे शिल्लक राहिले आहेत. अवकाळी वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे मळ्ळ्यांना फटका बसत असल्याने शेतकरी पर्यायी मार्ग अवलंबून शेती करीत आहेत.