Bhavantar Yojana : सोयापेंड (डीओसी) ची मागणी घटल्याने सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४ हजार ८९२ रुपये असताना सोयाबीनला सध्या ३ हजार ६२६ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. (Bhavantar Yojana)
त्यामुळे खामगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात घट आली आहे. अशा स्थितीत मागणी वाढून दर वाढणार, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. (Bhavantar Yojana)
प्रत्यक्षात हंगामापूर्वीच सोयाबीनच्या दरात कमी आली आहे. यावर्षी केंद्र शासनाने ४,८९२ रुपये क्विंटल असा सोयाबीनचा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, सोयाबीनचे दर चार हजारांच्या आत आहेत.
१२ मार्चला सोयाबीनला ३३०० ते ३९५० रुपये क्विंटल भाव मिळाला. १५ मार्चला यामध्ये १०० रुपयांनी वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात यंदा सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत.
शासनाचा कोणताही प्रक्रिया उद्योग सोयाबीनसाठी नाही. डीओसीच्या दरात कमी आल्याने प्लॉटधारकांकडून सोयाबीनची खरेदी होत नाही.
४ हजार ८९२ रुपये क्विंटल असा सोयाबीनचा हमीभाव आहे. मात्र सोयाबीनचे दर चार हजारांच्या आत आहेत. सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर तत्काळ बाजार समितीमधील दरामध्ये घसरण सुरू झाली. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.(Bhavantar Yojana)
काय आहे भावांतर योजना ?
सन २०२३-२४ मधील हंगामात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कापूस व सोयाबीनच्या दरात कमी आली. त्यामुळे शासनाने दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत कापूस व सोयाबीन पिकांसाठी केली.
यंदाच्या हंगामात या दोन्ही पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे. नाफेडच्या खरेदीमुळे बाजारातील स्पर्धा वाढेल व सोयाबीनला चढे दर मिळतील अशी अपेक्षा होती, ती यंदा फोल ठरली.
एकंदरीत उत्पादनाची सरासरी बघता खुल्या बाजारातील दर शासकीय खरेदी नसती तर पाचशे रुपयांनी अधिक राहिले असते; मात्र शासकीय खरेदीदरम्यानही बाजारातील दर दबावातच होते व आता त्यापेक्षाही कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच झाले. - श्रीराम राठोड, शेतकरी, जयरामगड बचाव
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन पिकाला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.- अमोल पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
असे आहेत सोयाबीनचे दर
८ मार्च | ३,६५० |
१० मार्च | ३,७०० |
११ मार्च | ३,७०० |
१२ मार्च | ३,६२५ |
१५ मार्च | ३,९२५ |