Lokmat Agro >बाजारहाट > कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे

कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे

Big decision of Onion Growers Association; Own onion centers to start from Diwali | कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे

कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे

पारंपरिक बाजारव्यवस्थेत भरडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी क्रांतीकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चांगला कांदा बाजारभाव मिळण्यासाठी स्वत:ची विक्री व्यवस्था उभी करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

पारंपरिक बाजारव्यवस्थेत भरडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी क्रांतीकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चांगला कांदा बाजारभाव मिळण्यासाठी स्वत:ची विक्री व्यवस्था उभी करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या काही दिवसांपासून कांदाबाजारभावासह टोमॅटो बाजारभावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कधी सरकारी धोरणांमुळे, तर कधी पारंपारिक शेतमाल खरेदीविक्रीच्या मध्यस्थ साखळीमुळे उत्पादक शेतकऱ्याचे कायमच नुकसान होत आले आहे. या समस्येकडे कोणालाच लक्ष द्यावेसे वाटत नसून उत्पादन मूल्यापेक्षाही कमी बाजारभाव घेऊन कायम निराशेचं जगणं शेतकऱ्याच्या वाट्याला येत आहे. मात्र आता येणाऱ्या काळात हे चित्र बदलणार असून स्वत: कांदा उत्पादक शेतकरीच त्यासाठी पुढाकार घेणार आहे.

‘आता वेळ आली आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वत:ची बाजारमूल्य साखळी करायला हवी. आम्ही गेल्या काही दिवसांपासून यावर काम करत असून लवकरच आमचा कांदा आम्हीच विकणार असून त्यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणार आहे,’ महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी ‘लोकमत ॲग्रो’ला ही माहिती दिली.

शेतकरी स्वत:च विक्रेत्याच्या भूमिकेत जाणार असून येत्या दिवाळीपर्यंत नवा कांदा बाजारात येईल, त्या अनुषंगाने आम्ही आमचा कांदा मार्केटमध्ये स्वत: विक्रीला घेऊन जाणार आहोत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आम्ही कांदा उत्पादक संघटनेमार्फत स्वत:ची विक्री केंद्र सुरू करणार आहोत. या संदर्भात नियोजनाचे बरेच काम पूर्ण झाले असून संपूर्ण व्यवस्था मार्गी लागल्यास दिवाळीतच आमची कांदा विक्री केंद्र सुरू होतील, अशी माहितीही श्री. दिघोळे यांनी दिली.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बैलगाडीतून कांदा विक्रीला सायखेडा, सिन्नर येथील बाजारसमित्यांमध्ये आमचे आजे-पणजे नेत असत. त्यानंतर वडिलांच्या काळात ट्रॅक्टरने कांदा विक्रीसाठी नेला जाई. मात्र आता पिकअप, छोटे ट्रक अशी वाहन व्यवस्था कांदा विक्रीसाठी झाली आहे. पण या सगळ्यात वर्षानुवर्षे एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे कांदा विक्रीला नेण्याचे बाजारसमित्यांसारखी पारंपरिक ठिकाणे. आज शेतकरी आधुनिक पद्धतीनं कांदा पिकवताना दिसतो. ऑटोमेशन, ठिबक, ड्रोन यांसारखे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले. मात्र शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणारी बाजारव्यवस्था मात्र जुनीच राहिली. त्याच व्यवस्थेत कधी व्यापारी, तर कधी सरकारच्या दावणीला शेतकरी बांधला गेला. मात्र नव्या पिढीचा शेतकरी आता सजग होत असून या व्यवस्थेवर मात करण्यासाठी तो सज्ज होत आहे, कांद्याचा प्रश्न काय आहे, ते आम्ही समजून घेतले आहे आणि आता त्यावर आम्हीच उत्तर शोधत आहोत, ते म्हणजे स्वत:च कांदा विक्रीतून, असा निर्धारही श्री दिघोळे यांनी बोलून दाखवला.

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव चांगला मिळत असतानाच भाव वाढीच्या धास्तीने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० % शुल्क आकारले. त्यामुळे भाव कोसळले, पण आपला कांदा बंदरावर अडकल्याने व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांसह संपूर्ण व्यवस्थेलाच वेठीला धरले. त्यावर उपाय म्हणून सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदीची सुरूवात केली खरी , पण त्यात असलेले अनेक निकष आणि बाजाराच्या तुलनेत मिळणारा कमी भाव यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांनी आपला कांदा नाफेडला देणे पसंत केले.

दुसरीकडे संभाव्य बाजारस्थितीमुळे दोन आठवड्यापूर्वी त्यानंतरही कांदा बाजारभाव हळूहळू वाढत होते, पण पुन्हा या दरांना घसरण लागली आणि आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बाजारसमित्यांमध्ये कांद्याचा सरासरी दर २ हजार ते २२०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावत असताना ऐन गणेशोत्सवाच्या काळात नाफेडच्या खरेदी विरोधात व्यापाऱ्यांनी पुन्हा संपाचा पावित्रा घेतला आहे. या सर्वांचा परिणाम कांदा बाजारभावावर होणार असून शेतकरी पुन्हा वेठीला धरला जाण्याची शक्यता आहे.

या सर्व पाश्वभूमीवर आता कांदा उत्पादक शेतकरी एकवटले असून रस्त्यावर आंदोलन, मोर्चे काढण्याच्या मार्गाने नव्हे, तर स्वत:ची बाजार विक्री व्यवस्था उभी करून आम्ही आता या प्रश्नाचा सामना करणार आहोत अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे. कांदा उत्पादन घेताना आम्ही आधुनिक बियाणे वापरले, आधुनिक तंत्र वापरले, मग विक्रीसाठीच पारंपरिक व्यवस्थचे आम्ही गुलाम का व्हावे? असा प्रश्न शेतकऱ्यांची नवी पिढी विचारत असून त्याचे उत्तर शोधण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे लवकरच एक-दीड महिन्यात कांदा उत्पादकांनी कांदा विक्रीचा प्रश्न स्वत:च सोडविल्याचे सुखद चित्र पाहायला मिळणार आहे.

‘आमची लढाई आता आमच्याशीच आहे, आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा कांदा विक्रीसाठी थेट बाजारात उतरू आणि पूर्ण तयारीने उतरू. अन्नदाता असलेला शेतकरी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा काय कमाल करू शकतो हे यापूर्वी जगाने अनेकदा अनुभवले आहे. आता कांदा उत्पादकही याच परिवर्तनाच्या वाटेवर चालतील, तुम्ही पाहालच.’ भारत दिघोळेंनी कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी या नात्याने विश्वास व्यक्त केला.

Web Title: Big decision of Onion Growers Association; Own onion centers to start from Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.