मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ७० किलो टोमॅटोची चोरी झाली होती. यामुळे पोलिसांसह बाजार समिती प्रशासनाने सुरक्षा विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्केटमधील टोमॅटोच्या आवकेची काटेकोरपणे नोंद ठेवली जात असून व्यापाऱ्यांनाही आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
देशभर टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये ३० ते १२५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये ८० ते ९०, तर किरकोळ मार्केटमध्ये १५० ते १८० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे.
सुरक्षा वाढविलीबाजार समितीच्या सुरक्षा विभागानेही भाजी मार्केटमधील सुरक्षा वाढविली आहे. कोणत्या व्यापाऱ्याकडे, किती टोमॅटो विक्रीसाठी आला आहे यावरही लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षारक्षकांनी व्यापाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
शनिवारी ७० किलो टोमॅटोची चोरीबाजारभाव वाढल्यामुळे बाजार समितीमध्ये टोमॅटोची चोरीही होऊ लागली आहे. शनिवारी जवळपास ७० किलो टोमॅटोची चोरी झाली होती. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी दोघांना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर बाजार समिती प्रशासन व एपीएमसी पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत.