संजय लव्हाडे
देशभरात लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू आहे. दुसरीकडे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेस दिलासा देण्यासाठी सरकार महागाई नियंत्रणात राहावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. सध्या तरी सर्वच प्रकारच्या डाळीमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर हरभरा, सोयाबीनसह सोन्या-चांदीतील विक्रमी घोडदौड सुरू आहे.
असे असतानाही तूर व मकामध्ये मात्र मंदी आहे. मागील काही दिवसांपासून हरभऱ्यामध्ये तेजी कायम आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी हरभऱ्यातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. हरभऱ्यामध्ये आणखी २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल तेजी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशातील हरभरा उत्पादन यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी राहण्याचा अंदाज आहे. हरभऱ्याचा हमीभावापेक्षा बाजार कमी होण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे. हरभऱ्यामध्ये आणखी तेजी आल्यास सरकार पिवळा वाटाणा आयात करून हरभऱ्याचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू शकते.
त्यामुळे येत्या काळात तुरीप्रमाणे हरभऱ्यात तेजी येण्याची शक्यता कमी आहे. २०० ते ३०० रुपयांच्या पुढे तेजी येण्याची शक्यता नाही. कारण तुरीमध्ये सरकारकडे भाव पाडण्यासाठी ठोस पर्याय नाहीत. सध्या हरभऱ्याचा भाव ५,२०० ते ६,२०० प्रति क्विंटल आहेत. दररोजची आवक २,००० पोत्यांची आहे.
मराठवाड्यातील कापसानंतरचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र यावर्षी सोयाबीनला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी पसरली आहे. त्यातच मागील आठवड्यापासून सोयाबीनमध्ये तेजी आली असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीनचे माल विकल्या गेला आहे. सोयाबीनमध्ये २०० रुपये प्रति क्विंटल तेजी आली असून, पुढील काही दिवसांत आणखी तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोयाबीनचे भाव ४,२५० ते ४,५५० प्रति क्विंटल आहेत, तर आवक तीन हजार पोत्यांची आहे.
केंद्र सरकारने तुरीच्या बाजारभावाकडे बारकाईने लक्ष ठेवले जात असून, तुरीचे भाव वाढल्यानंतर सरकारकडून तुरीचे व्यापारी तसेच विक्रेते इत्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो व अशा प्रकारातून तुरीचे भाव पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जातो. तुरीचे भाव ११ ते १२ हजार रुपये क्विंटल आहेत व तूरडाळीचे भाव १७० ते २०० रुपये किलोच्या दरम्यान आहेत. सध्या तुरीमध्ये ५०० रुपयांपर्यंत मंदी असून, भाव ७,५०० ते ११,३०० रुपये प्रति क्विंटल आहेत. तुरीची दैनंदिन आवक एक हजार पोत्यांची आहे.
टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
सोन्या-चांदीमध्ये विक्रमी तेजी
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्यामध्ये मोठी तेजी आली असून, ऐन लग्नसराईमध्ये सोने व चांदीचे विक्रमी तेजी गाठल्याने वर व वधू पक्षांची मंडळीच्या खिशाला आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे.
सोन्यातील ऐतिहासिक घोडदौड थांबता थांबत नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. सोन्याचे दर लवकरच ७५ हजारांचा टप्पा, तर चांदी ९० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या तरी सोने व चांदीमध्ये मंदीची शक्यता धूसर दिसून येत आहे.
बाजारभाव
गहू | २,२०० ते ४,००० प्रति क्विंटल |
ज्वारी | २,०५० ते ४,००० प्रति क्विंटल |
बाजरी | २,२०० ते २,६०० प्रति क्विंटल |
मका | १,८०० ते २,१५० प्रति क्विंटल |
करडी | ३,४०० ते ३,५०० प्रति क्विंटल |
गूळ | ३,१५० ते ३,८०० प्रति क्विंटल |
साखर' | ३,७५० ते ३,९५० प्रति क्विंटल |
पामतेल | १०,५०० प्रति क्विंटल |
सूर्यफूल | ११,००० प्रति क्विंटल |
सोयबीन तेल | १०,५०० प्रति क्विंटल |