यंदा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली होती. त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळाले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत आहे. आज ना उद्या कपाशीला चांगला दर मिळेल आणि चार पैसे हातात येतील, या आशेवर शेतकऱ्यांनी घरात ठेवलेल्या कापसाला आजही समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कापूस वेचणीनंतर शेतकरी थेट कापूस विक्रीसाठी जिनिंग किंवा बिटावर घेऊन जातो. मात्र, कापसाचा हंगाम सुरू आणि आवक जास्त असल्यामुळे कापसाला कमी दर मिळत आहे.
आज अनेक शेतकरीबाजारातील आवक कमी होईपर्यंत कापसाची गंजी लावून कापूस घरात ठेवतात. कापूस वेचणीच्या शेवटच्या हंगामात कापसाला जादा दर मिळेल, या आशेवर असतात. आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. बाजारातील कापसाची आवकही कमी झाली आहे. तरीही शेतकऱ्यांच्या कापसाला सरासरी ७५०० रुपये भाव मिळत आहे. दुसरीकडे पिवळ्या सोन्याच्या दराने मात्र ७५ हजारांचा टप्पा गाठला आहे.
निसर्गाच्या अवकृपेने आणि सध्या पिकांना मिळत असलेला दर पाहता शेतकरी कोमात अन् व्यापारी जोमात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाला मिळत असलेले सध्याचे सरासरी भाव ७,५०० रुपये, तर पिवळ्या सोन्याचे भाव मात्र झपाट्याने वाढत आहेत. शेतकऱ्यांना आजही घरातील कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी