बीड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव दिवाळी- पाडव्याच्या दिवशी सुरू ठेवलेल्या रेशीम कोष खरेदी केंद्रात तब्बल १० टन ३ क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली.
मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे हे केंद्र असून २४ ते ४८ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने विश्वास वाढला आहे. सर्व खरेदी केंद्र सीसीटीव्ही निगराणीखाली असून, शेतकऱ्यांच्या रेशीम शेतीसंबंधी माहिती, अनुदान तसेच विविध योजनांबाबत बाजार समितीच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. दररोज किमान एक तरी संचालकांची रेशीम खरेदी केंद्रात उपस्थिती असते. बाजार समितीच्या वतीने संपूर्ण स्वच्छता, मुबलक मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची सोय झाली आहे.
तीन महिन्यात...
- खरेदी केंद्रात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २ लाख २४ हजार २८७ किलो म्हणजेच जवळपास २२४ टन रेशीम कोषाची आवक झाली होती.
- या तीन महिन्यांत आलेल्या २२४ टन रेशीम खरेदीचे शेतकऱ्यांना ११ कोटी २ हजार ९९३ रुपये अदा करण्यात आले.
दोन महिन्यांत दोन विक्रम
२ ऑक्टोबर २०२३ रोजी विक्रमी १० टन ४ क्विंटल रेशीम कोषाची आवक नोंदविली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी १० टन ३ क्विंटल आवक झाली.
लागवड अन उत्पादनातही जिल्हा अव्वल
संपूर्ण संचालक मंडळ, सभापती, उपसभापती, सचिव व स्वतःला झोकून देत या रेशीम केंद्रात काम करत असलेले बाजार समितीचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट हेदेखील जिल्ह्यात रेशीम लागवडीस प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे राज्यात बीड जिल्हा रेशीम लागवडीत व उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.