राजाराम लोंढे
कोल्हापूर : गेल्या वर्षी लाल मिरचीने ग्राहकांना घाम फोडला होता, त्यामुळे खरीप हंगामात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन अधिक घेतले.
त्याचा परिणाम आवकेवर दिसत असला तरी 'गुजरात गोंदल'मधील मिरचीने 'ब्याडगी'चा भाव पाडला आहे. 'गुजरात गोंदल' मिरची रस्त्यावर विक्रीसाठी आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर निम्यावर आले आहेत.
चटणी वर्षभर लागत असली तरी बहुतांशी नागरिक फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांतच वर्षभराची बेगमी करून ठेवतात. गेल्या महिनाभरापासून मिरची खरेदीची धांदल दिसत आहे.
गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता.
दराने एकदम उसळी घेतल्याने शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले. त्यामुळे सध्या बाजारात मिरचीची आवक वाढलेली दिसते.
दर कमी झाले तरी खरेदी तेवढीच
साधारणतः वर्षभरात आपणाला चटणी किती लागते, याचा प्रत्येक गृहिणीला अंदाज असतो. त्यामुळे दर जरी कमी झाले तर लाल मिरचीची खरेदी तेवढीच होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोल्हापुरात येथून येथे लाल मिरची
ब्याडगी : हैदराबाद
केडीएल ब्याडगी : कर्नाटक
काश्मिरी : कर्नाटक
गुंटूर : तेलंगणा
गरुडा : कर्नाटक, तेलंगणा
गोंदल : गुजरात
लाल मिरचीचा तुलनात्मक दर प्रतिकिलो
मिरची प्रकार | मार्च २०२३ | मार्च २०२४ |
ब्याडगी | ६५० ते ७०० | २५० ते ३५० |
गुंटूर | २५० ते ३२० | २०० ते २३० |
लवंगी | ३०० ते ३२० | २८० ते २९० |
केडीएल, ब्याडगी | १००० ते १०५० | ४५० ते ५०० |
काश्मिरी | १२०० ते १३०० | ४०० ते ६०० |
जवारी | २००० ते २०५० | ७०० ते ८०० |
गरुडा | ३०० ते ३५० | २०० ते २५० |
गुजरात गोंदल | ३०० ते ३५० | २०० ते ३०० |
मिरची आवक यंदा चांगली असल्याने दर ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. मात्र, सध्याची आवकेची परिस्थिती बघता 'ब्याडगी'चे दर ३५० रु. पर्यंत स्थिर राहू शकतात. - राजेंद्र जंगम (मिरची व्यापारी)