Join us

लातूर बाजारसमितीतील खरेदी विक्री चार दिवसांपासून ठप्प, नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:42 AM

या बाजारसमितीची आवक बऱ्यापैकी असते. सर्वसामान्य नागरिक ज्वारी गहू खरेदी करतात. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून खरेदी विक्री थांबली आहे.

चार दिवसांपासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याची खरेदी-विक्री ठप्प आहे. हमालांना दरवाढ मिळावी अशी मागणी आहे. परंतु, बाजार समितीतील व्यापारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याने तोडगा निघत नाही, अशी परिस्थिती आहे.

दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी पंधरा दिवसांत हमालवाढीचा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, ४५ दिवस उलटूनही निर्णय झाला नाही. त्यामुळे पुन्हा बंद पुकारावा लागला असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांनी सांगितले.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची दररोजची आवक दहा ते पंधरा हजार क्विंटलच्या आसपास आहे. त्यात सर्वाधिक आवक सोयाबीनची असून, तूर, हरभरा, गहू, या शेतमालाची आवक बऱ्यापैकी असते. सध्या सर्वसामान्य नागरिक ज्वारी, गहू खरेदी करून ठेवतात. परंतु, गेल्या तीन-चार खरेदी करता येत नाही. त्यामुळे बाजार सुरू होण्याची वाट नागरिकांना पहावी लागत आहे. 

व्यापारी हमालीचा दर वाढवून देण्यास तयार नाहीत. तर हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेचे पदाधिकारी हमालीचा दर वाढवून मिळावा, यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे मागे १५ दिवस बाजार बंद होता. सध्या चार दिवसांपासून बाजार बंद आहे.

हमालीचा असा आहे दर...

तोंड लावायला १ रु. ९० पैसे आणि गाडीत लोड करायला ४ रु. ४० पैसे प्रति नग दर आहे. दर तीन वर्षांनंतर हमालीत वाढ केली जाते. तीन वर्षाची मुदत संपून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी झाला. परंतु, हमालीचा दर वाढविण्यात आलेला नाही. निर्णय घेण्यासाठी व्यापारी आणि हमाल, गाडीवान यांची संयुक्त बैठक होणे गरजेचे असते. परंतु, बैठक होत नाही. त्यामुळे तोडगा निघत नसल्याचे महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांनी सांगितले. बाजार समिती आणि कामगार आयुक्तांकडे बैठका झाल्या.

हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

हमालीचा दर वाढवून देण्याची मागणी कामगारांकडून होते. परंतु, व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. दर तीन वर्षाला नियमानुसार हमालीत वाढ होत असते. परंतु, त्यासाठीचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप युनियनने केला आहे. दीड महिन्यांपूर्वी लेखी आश्वासन बाजार समितीने दिले होते. तरीही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.

तीनवेळा बैठक होऊनही तोडगा नाही...

बाजार समिती आणि माथाडी बोडनि हमालीसाठी तीनवेळा बैठक घेतली. परंतु, त्या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निर्णय होऊ शकलेला नाही. यापूर्वीही १५ दिवस बाजार बंद ठेवला होता. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हमाल कामावर गेले. परंतु, त्याही आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे संप पुकारला आहे. - बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष माथाडी असोसिएशन

टॅग्स :मार्केट यार्डलातूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकामगारशेती क्षेत्र