होळी, धुळवड आणि आर्थिक वर्ष समाप्ती अर्थात मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीचा मोंढा व प्रसिद्ध हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार मंगळवार दिनांक २ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात मात्र शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यास अडचण निर्माण होणार आहे.
शेतकऱ्यांकडे हरभरा, गहू, हळद विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात हरभरा, गव्हाची काढणी आटोपली असून, हळद काढणीसह शिजवणीची लगबग सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांचे हळद काढणीचे काम आटोपले आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून नवीन हळद विक्रीसाठी मार्केट यार्डात येत आहे. यंदा समाधानकारक भाव मिळत असल्याने आवक वाढत आहे.
परंतु, आता होळी व धुळवड आणि मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च ते २ एप्रिलदरम्यान भुसार शेतमाल व हळद खरेदी - विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
भगवानरावांची मोसंबी जळाली, पण जिद्दीनं डाळिंब पिकवले अन् निर्यातही केले
खुल्या बाजारात लूट होण्याची शक्यता...
बाजार समितीचा मोंढा आणि हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार तब्बल बारा दिवस बंद राहणार आहेत. या दिवसांत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल खुल्या बाजारात विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. याचा फायदा व्यापारी घेण्याची शक्यता असून, खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.