रत्नागिरी: यावर्षी तिखटाच्या लाल मिरचीचे उत्पादन सर्वत्र चांगले झाल्यामुळे आवक वाढली आहे. बाजारात लाल मिरची मुबलक स्वरूपात विक्रीला आल्याने दरात घसरण झाली आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत घरोघरी वर्षभर पुरेल एवढे तिखट तयार केले जात असल्यामुळे लाल मिरची खरेदी केली जात आहे. तिखटासाठी जिल्ह्यात सर्वाधिक ब्याडगी मिरचीचाच वापर केला जातो. ही मिरची अन्य मिरचीच्या तुलनेत कमी तिखट आहे.
त्यामुळे कमी तिखट व रंगासाठी ब्याडगी, गुंटूर या प्रकारच्या मिरच्या सर्वाधिक वापरल्या जातात, तर तिखटाला लालबुंद रंग आणण्यासाठी काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो.
गतवर्षी ब्याडगी मिरचीचे दर ५०० रुपयांच्या घरात होते, यावर्षी निम्म्यापेक्षा दर खाली आल्याने गृहिणींमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोणत्या मिरचीचा काय दर?
मिरची | किमान | कमाल | गतवर्षीचा |
ब्याडगी | १५० | ३०० | ४५० |
गरुडा | १०० | २५० | ३५० |
गुंटूर | १५० | २०० | २५० |
लवंगी | १८० | २१० | ३०० |
दर का उतरले? कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांत लाल मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. यावर्षी मिरचीचे पीक चांगले आले आहे. शिवाय गतवर्षीची १० टक्के मिरची शिल्लक असल्याने यावर्षी दर निम्म्यापेक्षा खाली आले आहे.
यावर्षी मिरचीचे उत्पादन मुबलक असल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. मे महिन्यापर्यंत तिखट तयार केले जात असल्याने मागणी वाढणार आहे. त्यामुळे आणखी दर खाली येण्याची शक्यता आहे. - सूर्यकांत जाधव, व्यापारी