निंगाप्पा बोकडेचंदगड : नागणवाडी, चंदगड, तुर्केवाडी, कानूरसह तालुक्यात इतरत्र बाजारपेठेत काजू बियांची खरेदी सुरू झालेली आहे. आर्थिक नड असलेले शेतकरी काजू बियांची विक्री करीत आहेत. मात्र, पडलेल्या दरामुळे बहुतेक शेतकरी आपल्या काजू बियांची विक्री करण्यास उत्सुक नाहीत. घसरलेल्या दरामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
केवळ ९५ रुपये ते १०० प्रतिकिलो दराने काटेधारक काजू खरेदी करीत आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी काजू बिया विक्रीस येत असल्याने खरेदीदारांमध्ये निराशा आहे. तालुक्यासह परिसरातील असंख्य काजू बिया उत्पादकांचे हे 'पांढरे सोने' या आठवड्यातदेखील काळवंडल्याची स्थिती अधोरेखित झाली आहे.
चंदगड, तुडीये, देवरवाडी, शिनोळी, सुरूते, ढेकोळी, कोलीक, कानूर, झांबरे, उमगाव, हेरे, पाटणे आणि परिसर काजू बिया उत्पादन मोठ्या प्रमाणात होतात. यावर्षी काजू बियांत घट झाली असून, चविष्ट काजूगर असलेल्या बिया काळवंडतात.
त्या पुरेशा प्रमाणात पक्व होत नाहीत. याचा परिणाम थेट दरावर होतो. यामुळेच यावर्षीही काजू बिया माफक आणि न परवडणाऱ्या दरात खरेदी केल्या जात आहेत. केरळ आणि कर्नाटकाप्रमाणे टांझानिया, घाना, अर्जेंटिनासारख्या देशांतून काजू बिया ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने मिळतात.
चवीला जेमतेम असूनही केवळ पांढऱ्या शुभ्र रंगाला भुलून ग्राहक त्यापासून बनलेले खाद्यपदार्थ खरेदी करतात. त्यांना काजूगर चवीशी देणे-घेणे नसून, याचाही फटका नकळत काजू उत्पादकांना बसत आहे. २०१८ मध्ये काजूला प्रतिकिलो १५० हून अधिक दर मिळाला. मात्र, त्यानंतर असे 'अच्छे दिन' उत्पादकांच्या वाट्याला कधी आलेच नाहीत. मोठे काजू उत्पादकांनी अद्याप आपल्याकडील काजू विक्रीला बाहेर काढली नाही.
ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना कर्ज परतफेड, लग्न आणि इतर कारणांसाठी पर्याय नसल्याने त्यांच्याजवळ असलेले 'पांढरे सोने' कवडीमोल दराने विकणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यांच्या या असहाय्य स्थितीचा फायदा उचलण्यासाठी काही काटेधारक अशा शेतकऱ्यांच्या थेट घरापर्यंत जाऊन दराची स्थिती बदलणार नसल्याचे कमी दरात काजू खरेदी करीत आहेत.
काजू बोर्डाचा फायदा होणार कधी?यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच काजू उत्पादक आणि संबंधित उद्योगाचा मुद्दा समोर आला होता. तसेच काजू बोर्डाची स्थापना झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही याचा विसर पडल्याने त्यांच्याविषयी काजू उत्पादक नाराज आहेत.
अधिक वाचा: शेतकरी काजू बी शेतमाल तारण कर्ज योजनेच्या प्रतीक्षेत; कसे मिळते कर्ज?