कोल्हापूर : कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचे धरसोड वृत्ती कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दरात अस्थिरता निर्माण झाल्याने घाऊक बाजारात कांदा सहा रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.
यंदाचे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरले आहे. वर्षभरातील दर सरासरी २२ रुपयांच्या वर गेलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फुका पासरी दराने कांद्याची विक्री करावी लागली. खरिपाचा कांदा आता बाजारात येऊ लागला आहे.
साधारणतः डिसेंबर, जानेवारीमध्ये काढलेला कांदा चाळीत होता. दर कमी असल्याने तो बाजारात आणण्याचे धाडस शेतकऱ्यांचे होत नव्हते. आगामी काळात दरात वाढ होईल, या अपेक्षेपोटी शेतकरी थांबला होता.
मात्र, मार्च महिना निम्मा झाला तरी दरात सुधारणा होईना. त्यात केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धरसोड वृत्तीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी दंगा केल्यानंतर केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली, पण तीन लाख टनांची मर्यादा घातली. त्याचा फारसा फरक दरवाढीवर झालाच नाही.
सध्या कोल्हापूर बाजार समितीत दौंड, नाशिक, जेजुरी आदी भागांतून कांदा मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. पण एकदम आवक वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात किलोमागे दोन रुपयांची घसरण दिसत आहे.
सहा दिवसांतील कांद्याचा दर
वार - आवक पिशवी - दर रु.
शनिवार - १९,१४४ - १५
सोमवार - १७,९८० - १४
मंगळवार - ९,६५० - १३
बुधवार - १४,९७८ - १३
गुरुवार - ६,७२८ - १२
शुक्रवार - १०,६६० - ११
तेजीची वाट किती दिवस?
कांद्याला तेजी येईल या आशेपोटी शेतकऱ्यांनी चाळीतच कांदा ठेवला होता. मात्र, तेजीची वाट किती दिवस बघायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
केंद्र सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांना तेजी-मंदीचा अंदाज नसल्याने बाजारात येत असलेला अतिरिक्त कांदा, यामुळे दर घसरले आहेत. आणखी पंधरा दिवस असा चढ- उतार राहील. त्यानंतर प्रतिकिलो दोन ते चार रुपयांची वाढ अपेक्षित आहे. - रोहित सालपे (व्यापारी, कांदा-बटाटा)