केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याची अधिसूचना काढल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले असून, सोमवारी राज्यभरातील बहुतांशी बाजार समितींत आंदोलने झाली. काही ठिकाणी लिलाव बंद होते. मात्र, चाळीसगावबाजार समितीत कोणताही व्यत्यय न येता बुधवारी देखील लिलाव सुरळीत पार पडले.
चाळीसगाव परिसरात गत १० वर्षात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले असून बाजार समितीत कांदा मार्केटही सुरू झाले आहे. त्यामुळे दरदिवशी दीडशे ते दोनशे वाहनांमधून कांदा येथे लिलावासाठी येतो. शनिवारी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम कांद्याचे भाव कमी होण्यावर होईल. यामुळेच राज्यभरात याविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत.
२१०० प्रतिक्विंटल मिळाले भाव
- बुधवारी येथील बाजार समितीत सकाळी ११ वाजेपर्यंत ८०हून अधिक वाहने कांदा लिलावासाठी दाखल झाली होती. दुपारी १२ पर्यंत ही संख्या १२५ वर पोहोचली. यानंतर लिलाव सुरु झाले. ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. कांद्याला प्रतिक्चिटलला २१०० रुपये भाव मिळाले, अशी माहिती सचिव जगदीश लोधे यांनी दिली.
- २ शेतकऱ्यांच्या विनंतीवरून तसेच व्यापायांनीही पुढाकार घेऊन चाळीसागाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाचे कामकाज सुरळीत सुरु ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर बाजार समितीमध्ये जो भाव असेल, त्यानुसारच येथे कांदा विक्री होत आहे, शेतकऱ्यांनी बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळाकडे मागणी केलेली होती. त्यानुसार येथे दरदिवशी लिलाव होत आहे. लिलावाच्या वेळी वरिष्ठ लिपिक सोमसिंग राजपूत, उल्हास नेरकर, प्रवीण वाघ, सचिव प्रशांत मगर आदी उपस्थित होते.
बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव बाजार समितीचे कामकाज किंवा कांद्यासह इतर धान्याच्या लिलावाचे कामकाज हे बंद करता येणार नाही. असा कोणताही आदेश बाजार समितीच्या प्रशासनास नाही." - कपिल पाटील, सभापती, बाजार समिती, चाळीसगाव