वाशिम : जिल्ह्यात यंदा एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया (Chia) या नाविण्यपूर्ण पिकाची लागवड (Cultivation) करण्यात आली आहे. यामाध्यमातून शेतकरी आर्थिक उन्नती साधू पाहत आहेत. दरम्यान, ६ जानेवारीला चिया उत्पादक शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर जाऊन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.
चिया उत्पादकांच्या समस्या जाणून घेतानाच आगामी काळात शेतकऱ्यांनी चियाचे केवळ उत्पादन घेण्याकडे नव्हे; तर ब्रँडिंग(Branding) आणि मार्केटिंगवरही(marketing) भर देऊन अधिकाधिक लाभ पदरात कसा पडेल, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब दराडे, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, सरपंच शिल्पाताई वाठोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक महादेव सोळंके यांनी केले.
जगदीश देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळ कृषी अधिकारी एम. डी. सोळंके, कृषी पर्यवेक्षक नितीन ठाकरे, सिद्धार्थ गिमेकर, नितीन वाडेकर, राजू ठाकरे, राजेश छत्रे, सी. डी. तोटवाड, माधव झामरे, दत्तात्रेय बुंदे, जगदीश देशमुख उपस्थित होते.
मार्केटिंग, ब्रँडिंगसाठी प्रशासन करणार सहकार्य!
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील चिया उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी चियाच्या मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी कुठलीही अडचण आल्यास ती निकाली काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सहकार्य करणार असल्याचे सांगितले. पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
चियामधील मोहरी पिकाचे त्वरित उच्चाटन करा
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी चियाच्या शेतात आंतरपीक म्हणून मोहरीची लागवड केली आहे. ही बाब धोकादायक असून, मोहरीचे दाणे चियामध्ये मिसळल्यास प्रत्यक्ष उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी चियाची गुणवत्ता राखण्यासाठी मोहरीचे त्वरित उच्चाटन करावे, असे 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी सांगितले.
हे ही वाचा सविस्तर: Agro Advisory :मराठवाड्यासाठी कृषी हवामान सल्ला वाचा सविस्तर