छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील बुधवारच्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो २५ ते २७ रुपयांचा दर मिळाला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
केळगावसह आमठाणा परिसरात शेतकरी नगदी पीक म्हणून मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. विशेष म्हणजे, अल्प पाणी असतानाही शेतकरी एप्रिल ते जून या कालावधीत या पिकाची लागवड करून हे उत्पादन घेण्यासाठी मोठा खर्चही करतात. अपेक्षेनुसार त्यांना उत्पादन मिळते.
त्यामुळे या परिसरातील मिरची मुंबई, गुजरात, दिल्ली, बंगळुरू, अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठविली जाते. शिवाय दरही चांगला मिळतो. केळगाव, आमठाणा येथील शेतकऱ्यांसाठी जवळ असलेल्या आमठाणा बाजारातही मिरचीला ८० ते ९० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली.
आता या मिरचीची आवक सुरू आहे. बुधवारी आमठाणा येथील मिरची बाजारात मिरचीला प्रतिकिलो फक्त २५ ते २७ रुपयांचा तर प्रतिक्विंटलला दर २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, मिरची तोडण्यासाठीची मजुरी ८ रुपये प्रतिकिलो शेतकऱ्यांना मोजावी लागते.