Join us

Chilli Market आमठाणा येथील बाजारात मिरचीचा दरात कमालीची घसरण; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 21:40 IST

आमठाणा येथील बुधवारच्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो २५ ते २७ रुपयांचा दर मिळाला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील बुधवारच्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो २५ ते २७ रुपयांचा दर मिळाला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

केळगावसह आमठाणा परिसरात शेतकरी नगदी पीक म्हणून मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. विशेष म्हणजे, अल्प पाणी असतानाही शेतकरी एप्रिल ते जून या कालावधीत या पिकाची लागवड करून हे उत्पादन घेण्यासाठी मोठा खर्चही करतात. अपेक्षेनुसार त्यांना उत्पादन मिळते.

त्यामुळे या परिसरातील मिरची मुंबई, गुजरात, दिल्ली, बंगळुरू, अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठविली जाते. शिवाय दरही चांगला मिळतो. केळगाव, आमठाणा येथील शेतकऱ्यांसाठी जवळ असलेल्या आमठाणा बाजारातही मिरचीला ८० ते ९० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली.

आता या मिरचीची आवक सुरू आहे. बुधवारी आमठाणा येथील मिरची बाजारात मिरचीला प्रतिकिलो फक्त २५ ते २७ रुपयांचा तर प्रतिक्विंटलला दर २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, मिरची तोडण्यासाठीची मजुरी ८ रुपये प्रतिकिलो शेतकऱ्यांना मोजावी लागते.

हेही वाचा - Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ

 

टॅग्स :बाजारमिरचीमार्केट यार्डमार्केट यार्डसिल्लोडशेतकरीशेतीशेती क्षेत्र