गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याच्या शिवणी व देऊळगाव परिसरात नदीपात्रात खरबूज पिकाची लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आले आहे. स्थानिक स्तरावरील खरबुजाला जिल्ह्यातील नागरिकांकडून मागणी होत आहे.
उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे माणसाच्या अंगाची लाहीलाही होते. शरीरातील पाणी कमी होत असल्याने खरबुज, टरबुज व इतर फळांना मागणी होत असते. सदर फळे खाल्ल्याने शरीराला पाणी तर मिळतेच तसेच शरीरातील उष्णता कमी होते.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ६० रूपये किलो दराने खरबुजाची विक्री केली जात आहे. शिवणी व देऊळगाव परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील खरबूज आरमोरी व गडचिरोली शहरात विक्रीसाठी आणत आहेत.
काही शेतकरी ठोक स्वरूपात किरकोळ विक्रेत्यांना खरबूज देऊन मोकळे होत आहेत. शहरातील किरकोळ विक्रेते दिवसभर नागरिकांना खरबुजाची विक्री करून आपली मजुरी काढत असल्याचे दिसते. लालसर व गोड खरबुजाला गडचिरोलीकरांकडून मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी 'लोकमत अॅग्रो' शी बोलताना सांगितले.
आरोग्यदायी फायदे
खरबुज खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. व्हायरस व बॅक्टेरियाच्या संसर्गापासून दूर राहता येते. खरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. त्यामुळे खरबूज खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाबग्रस्त लोकांना खरबुजाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण यातून मिळणारे पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते.
आज गुरुवार आणि बुधवार (दि.८) रोजी राज्यातील विविध बाजारात खरबुजला मिळालेला दर व झालेली आवक
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
09/05/2024 | ||||||
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 34 | 500 | 1200 | 750 |
राहता | --- | क्विंटल | 2 | 2000 | 2000 | 2000 |
08/05/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 37 | 1000 | 1800 | 1400 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 1695 | 1800 | 2600 | 2200 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 43 | 1000 | 2500 | 1400 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 219 | 1500 | 2000 | 1750 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 2 | 1100 | 1600 | 1600 |
नाशिक | नं. १ | क्विंटल | 20 | 1200 | 2200 | 1800 |
हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत