सोलापूर : आषाढ महिन्यानंतर येणाऱ्या श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन आणि श्रावणी बैल पोळा आदी सणांसाठी नारळाला मागणी राहते.
मात्र, यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला परिणामी आवक घटल्याने नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते. उत्सवांच्या निमित्ताने पूजेपासून ते सत्कारापर्यंत आणि मिठाईपासून घरगुती वापरापर्यंत नारळाची आवश्यकता दर वाढल्याने दरवाढीचा नारळ फुटला असे ग्राहक म्हणत आहेत.
शहरातील बाजारपेठेततामिळनाडू, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश येथून नारळाची आवक होते. आठवड्याला १० ते १२ ट्रकमधून अडीच ते तीन हजार पोत्यांमधून अडीच ते तीन लाख नारळ बाजारात दाखल होतात.
गेल्यावर्षी नारळाचा दर १,२००-१,३०० रुपये होता, तो यावर्षी १,५००-१,६०० पर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात नारळ प्रती नग २० रुपयांवर पोहोचले आहे. नारळाचे भाव वाढले असले तरी त्याची मागणी घटली नसून सण-उत्सवामुळे मागणी वाढतच आहे.
घटलेले उत्पादन आणि सणांच्या कालावधीत वाढलेल्या मागणीमुळे नारळाच्या घाऊक भावांत गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे.
कोणता नारळ कशासाठी वापरतात
तामिळनाडूचा नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो. तर, आंध्रचा पालकोल तसेच मद्रास नारळ घराघरांत स्वयंपाकासाठी वापरला जातो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक, खानावळ, केटरिंग व्यावसायिकांकडून या नारळाला मोठी मागणी राहते.
आखाडापासून सुरू झालेली ही मागणी दिवाळीपर्यंत कायम राहील. गणपती, नवरात्र, नारळी पौर्णिमा या काळात त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात बाजारात नारळांना मागणी वाढली असून, भाव किंचित वाढले आहेत. - रोहण बिराजदार, नारळाचे व्यापारी