गेल्या महिन्यात गगनाला भिडलेले कोथिंबीर पिकांचे भाव एकाएकी कोसळल्याने सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथील एका शेतकऱ्याने एक एकर कोथिंबीर पिकावर नांगर फिरवल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना कधी नव्हे तो चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली की अचानक पिकांचे भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरणात निर्माण झाले आहे.
भोजापूर खोरे परिसरात दरवर्षी मोठचा प्रमाणात मेथी, कोथिंबीर, छानणी, आदी थोड्या कालावधीत येणाऱ्या पिकांना शेतकरी पसंती देत असतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीला कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा कोथिंबिरीचे पीक घेतले होते. साधारण १५ ते २० दिवसांपूर्वी कोथिंबिरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पल्लवित झाल्या होत्या आशा यावेळी बहुतांश शेतकऱ्यांनी काढणीला आलेली कोथिंबीर बाजारात नेऊन चांगला भाव पदरात पाडून घेतला.
सिन्नर व निफाड तालुक्यांत अनेक भागात चार ते पाच एकर कोथिंबिरीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कौतुक होत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच कोथिंबीर पिकांचे भाव हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली. कासारवाडी येथील युवा शेतकरी व माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी यावेळी एक एकर कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कोथिंबिरीला मिळत असलेला भाव बघून त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यावेळी त्यांची कोथिंबीर काढणीयोग्य नव्हती. आता त्यांची कोथिंबिरीची वाढ झाली असल्याने काढणीयोग्य होती.
भाजीपाला दरात चढ-उतार
कोथिंबीर पिकाच्या लागवडीपासून ते वाढ होण्यासाठी साधारण दोन महिन्यांत हे पीक काढणीसाठी येते. मात्र, दरवर्षी मेथी व कोथिंबीर ही पिके घेताना शेतकऱ्यांना कधी नफा. तर कधी तोटा सहन करावा लागत असल्याच्या अनेक घटना आहे.
भाजीपाला पीक घेणे एक प्रकारे जुगारच शेतकरी खेळत असतो. यावर्षी भावात चढ-उतार झाल्याने अचानक भाव कोसळल्याने देशमुख यांनी पिकावर नांगर फिरवल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. तसेच दोन महिने शेतही अडकल्याने त्यांना दुसरेही पीकही घेता आले नाही. त्यामुळे त्यांना दुहेरी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत तोटा सहन करावा आहे.
गेल्या आठवड्यापासून कोथिबीर पिकांचे भाव चढ-उतार होत असतानाच भाव कोसळल्याने त्यांची कोथिबीर शेतातच पडून होती. भाव वांडेल या अपेक्षेने देशमुख यांनी थोडे दिवस वाटही बघितली. मात्र, बाजारभाव अधिकच कोसळल्याने ते हवालदिल झाले. तसेच आता कोथिबीर पिकांचे भाव इतके पडले आहेत की व्यापारी आता कोथिंबीर बघण्यासाठी शेतात यायलाही तयार नाहीत. त्यामुळे देशमुख यांनी नाइलाजास्तव आपल्या एक एकर कोथिंबीर पिकावर नांगर फिरवला आहे. त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरत असताना हळहळ व्यक्त होत आहे.