Join us

व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:12 AM

वादळी पावसामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर केळी मालाच्या उपलब्धतेत घट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या भावात तेजी अपेक्षित होती. तशी ती आहेसुद्धा परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे.

किरण चौधरी

वादळी पावसामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर केळी मालाच्या उपलब्धतेत घट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या भावात तेजी अपेक्षित होती. तशी ती आहेसुद्धा परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे.

बऱ्हाणपूर केळी लिलाव बोर्डावर गेल्या काही दिवसांपासून केळी भावात चढउतार होत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. सद्यस्थितीत दोन हजार रुपये प्रतीक्विंटलच्या आसपास भाव आहेत मात्र त्यात दोनशे ते तीनशे रुपयांनी चढउतार केले जात आहेत.

यंदा नवती केळी बागांच्या कापणीच्या मुहूर्तावरच केळी बाजारभावावर मंदीचे सावट होते. परिणामतः ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दरात चांगल्या दर्जाच्या केळीची कापणी शेतकऱ्यांना करावी लागली.

उन्हाळ्याच्या उत्तरार्धात आंब्याच्या दरात झालेली वाढ व अन्य उन्हाळी फळांची झालेली घट पाहता केळीची बाजारपेठेमध्ये मागणी वाढली. मेच्या उत्तरार्धात आलेल्या उष्णतेच्या लाटेत केळीला ग्राहकांची पसंती आणखी वाढली. त्यामुळे केळीच्या मागणीत वाढ झाली.

परिणामतः बऱ्हाणपूर केळी लिलाव बोर्डावर भाव टप्प्याटप्प्याने १७०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोहोचले आणि त्यानंतरही केळी भावाने अचानक उसळी घेऊन २००२ रुपये प्रतिक्विंटल असा भाव गाठला होता. इकडे २००० रुपये क्विंटल, असा केळी भाव दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर बन्हाणपूर बाजारात केळी भाव ३०० रुपयांनी खाली आला. २००० रुपये भावांमुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या.

केळी कापणीत शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला तर दुसरीकडे व्यापारी वर्गाने केळी भाव खाली आणला. नंतर मात्र पुन्हा दोनशे रुपये प्रतिक्विंटलने भावात वाढ देत व्यापारी वर्गाने १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटल दरांची सातत्याने चढउतार सुरू ठेवली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे.

केळी भावांवर नियंत्रण ठेवून स्थिरता आणावी, यासाठी रावेर बाजार समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी बऱ्हाणपूर बाजार समितीचे सचिव हितेंद्र शिकरवार यांची भेट घेतली. यावेळी रावेर बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, माजी सभापती रमेश पाटील, योगिराज पाटील, पीतांबर पाटील, संचालक जयेश कुयटे, सोपान पाटील व सचिव गोपाळ महाजन, उपसचिव विजय तायडे उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही

गेल्या केळी हंगामातही केळी भाव ३००० रुपये प्रतिक्चिंटलपर्यंत पोहोचताच व्यापारी वर्गाने चक्क केळी लिलाव बाजार बंद पाडला होता. त्यामु‌ळे बऱ्हाणपूर केळी लिलाव बाजारात व्यापारी वर्गाची एकाधिकारशाही कायम असल्याची टीका होत आहे.

बऱ्हाणपूर केळी लिलाव बाजारावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व बच्हाणपूरच्या जिल्हाधिकारी नव्या अग्रवाल यांनी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळीला भाव मिळत नाही. शेतकरी आपला माल शेतात जास्त दिवस ठेवू शकत नाही, त्याचा व्यापारीवर्ग फायदा घेत आहेत. यावर कुठेतरी प्रतिबंध घालण्यात यावा. - रामचंद्र सीताराम पाटील, गाढोदा, ता. जळगाव.

 

केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही. त्यामुळे व्यापारी वर्ग जुमानत नसल्याची स्थिती आहे. आता यावर प्रशासनानेच नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. - संजय माधव पाटील, जळके, ता. जळगाव

 

टॅग्स :केळीशेतकरीशेतीबाजारशेती क्षेत्रजळगाव