राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने धडाका लावला होताच, शिवाय सप्टेंबरच्या सुरुवातीलाही धुमाकूळ घातला. राज्यभरात पावसाने धडाका लावला. त्यामुळे पालेभाज्यांचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात घट आली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
परिणामी बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली असून, किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. कोथिंबिरीचे भाव ४०० रुपये प्रति किलो झाले आहेत.
सध्या बाजारात कोथिंबीर २० रुपये छटाक आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा फटका भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
नवीन उत्पादनदेखील कमी झाले आहे. सध्या हिरव्या पालेभाज्यांची बाजारात आवक कमी झाली आहे. केवळ भेंडी, वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, तसेच शेवगा आदी भाजीपाला पहावयास मिळत आहे.
पुसद तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याला फटका बसणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बाजारात पालेभाज्यांची मागणी वाढली आहे, मात्र आवक कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली. कोथिंबीर, मेथी, पालक भाजी महागली आहे. तर भेंडी, बरबटी, पत्ताकोबी, शेपू व अन्य भाज्यांचे दरही वाढले आहे.
पावसामुळे बाजारातील आवकीवर होऊन दरात वाढ झाली आहे. त्यात सर्वच भाज्यांना चव देणाऱ्या कोथिंबिरीचा दर किरकोळ बाजारात साडे तीनशे रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे जेवणातील चव कमी झाली असून, गृहिणी नावालाच कोथिंबीरचा वापर करीत आहेत.
त्यात पालेभाज्यांची उगवणच झाली नाही, तर तोडणीवर आलेल्या पालेभाज्या अतिपावसामुळे शेतातच सडून गेल्या. परिणामी बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यात सर्वाधिक परिणाम कोथिंबीरच्या आवकीवर झाला आहे.
पोह्यापासून ते आमटी आणि प्रत्येकच भाजीत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीरचे दर त्यामुळे साडे तीनशे रुपये प्रती किलोवर पोहोचले आहेत. ठोक बाजार पेठेत कोथिंबीर ३०० ते ३२० रुपये प्रति किलो दराने विक्रेत्यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांना कमी दरात विकणे परडवत नाही.
ग्राहकही कोथिंबीर महाग झाल्याने खरेदीत हात आखडता घेत आहे. जिल्ह्यातील सर्वच शहरातील भाजी बाजारांमध्ये असे चित्र दरदिवशी पहायला मिळत आहे.
पुढच्या महिन्यात दर घसरण्याची शक्यता
•नव्या लागवडीतील कोथिंबीर येण्यास अद्याप महिनाभराचा कालावधी आहे.• या कोथिंबिरीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर सध्या बाजारात असलेले दर कमी होण्याची शक्यता भाजीपाला विक्रेत्याकडून व्यक्त केली जात आहे.
• तथापि, पावसाने पुन्हा ठाण मांडल्यास दर कमी होण्याऐवजी अधिकच वाढण्याचीही शक्यता आहे.
• भाजी विक्रेत्यांची मर्यादेतच खरेदी मागील काही दिवसांपासून कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
त्यामुळे ग्राहक खरेदीबाबत उत्साही नाहीत. अशात मोठ्या प्रमाणात कोथिंबीर खरेदी करुन ठेवणे विक्रेत्यांना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे ते मर्यादीत प्रमाणातच कोथिबीरची खरेदी करुन विक्री करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
दीड महिन्यात दीडशेंनी वाढले दर
कोथिंबीरच्या दरात मागील महिनाभरात किलोमागे जवळपास दिडशे रुपयांची वाढ झाली आहे. जुलै आणि ऑगस्टच्या मध्यंतरापर्यंत कोथिंबीरचे दर साधारणतः २०० रुपये प्रती किलोपर्यंत होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला हे दर ३०० रुपये प्रती किलो आणि आता थेट ३५० रुपये प्रती किलोवर पोहोचले आहेत.
मागणीतही मोठी वाढ
मागील काही दिवसांपासून सणउत्सवाचा काळ सुरू झाला आहे. गौरीपूजनाचा उत्सव नुकताच पार पडला असून, गणेशोत्सव सध्या सर्वत्र साजरा होत आहे. या उत्सवादरम्यान भाजीपाल्यासह कोथिंबिरीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तथापि, पुरवठा कमी असल्याने कोथिंबिरीच्या दरावर परिणाम झाला आहे.
सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान
सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात त्यामुळे आवक घटली आहे. प्रामुख्याने कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने दर वाढले आहेत. ठोक बाजारात साधारणतः २८० ते ३२० रुपये प्रति किलो दराने आम्हाला कोथिंबीर खरेदी करावी लागत आहे.-मदन गाढवे, भाजी विक्रेता, वाशिम