एकीकडे पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. तर विपरीत परिस्थितीत पिकवलेल्या कोथिंबीर पिकाला बाजारात शेकडा ५० ते १५० रुपये असा मातीमोल दर मिळत आहे. अगदी पिकाच्या उत्पादनासाठी घालवलेले भांडवलही वसूल होत नसल्याची सद्यस्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडून निघाली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या वळवाच्या तसेच मान्सूनच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कोथिंबीर, मेथी, पालक, कांदापात, शेपू आदी पालेभाज्यावर्गीय पिकांची पेरणी केली होती. दरम्यान या भागात मान्सूनने साफ निराशा केली. ऐन पीक वाढीच्या काळात पाण्याची टंचाई निर्माण झाली. विपरीत परिस्थितीत पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पालेभाज्या पूर्णत्वाकडे आणल्या आहेत.
सध्या बाजारात कोथिंबीर पिकाचे भाव कोसळले आहेत. कोथिंबिरीला शेकडा ५० ते १५० रुपये असा नीचांकी भाव मिळत आहे. त्यामुळे कोथिंबीर पिकाचे अनेक फड काढणीवाचून पडून आहेत. तर मेथी शेकडा ८०० ते १ हजार रुपये, शेपू ३०० ते ५०० रुपये, कांदापात ४०० ते ६०० रुपये, पालक ५०० ते ७०० रुपये दराने विकले जात आहे. वास्तविक पिकाच्या उत्पादनासाठी खर्च केलेले भांडवल विपरीत परिस्थितीत पिकांचे काढलेले उत्पादन पाहता हा भाव आम्हा शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्याच्या पदरी निराशा....कोथिंबिरीच्या शंभर जुड्यांचे उत्पादन घेण्यासाठी सरासरी ८०० ते १ हजार रुपये खर्च येत आहे. त्यामध्ये शेतमशागत, खते, कोथिंबीर बियाणे, पेरणी, मजुरी, फवारणी, काढणी, सुतळी, वाहतूक खर्च आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत कोथिंबिरीला प्रतीनुसार शेकडा ५० ते १५० रुपये भाव मिळत आहे. त्यानुसार शंभर जुड्यांचे दीडशे रुपये होतात. त्यामधून बाजारात आडतदार हमाली व मापाडी खर्च कापून शंभर रुपये शेतकऱ्याच्या हातात टेकवत आहेत.