Join us

दर वाढेल म्हणून कापूस अन् सोयाबीनची साठवणूक केली, बाजारभाव गेले मात्र हमीभावापेक्षा खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 12:05 PM

सोयाबीन, कापसाच्या दरात प्रचंड घसरण होत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली गेले आहेत. त्यामुळे दोन्ही मालाची साठवणूक केलेला शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. नेवासा तालुक्यात मागच्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन आणि कापसाच्या उत्पन्नात मोठी घट आली होती.

सोयाबीन, कापसाच्या दरात प्रचंड घसरण होत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली गेले आहेत. त्यामुळे दोन्ही मालाची साठवणूक केलेला शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. नेवासा तालुक्यात मागच्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन आणि कापसाच्या उत्पन्नात मोठी घट आली होती.

मागणी आणि पुरवठ्याचे गणित लक्षात घेता सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज शेतकऱ्यांना असताना केंद्र सरकारने सोयापेंडची आयात करून सोयाबीनचे दर नियंत्रणात आणले. त्यामुळे दर वाढण्याच्या आशेने कापूस अन् सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेल्या अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. एकीकडे उत्पादनात घट होऊन शेतमालाचे दर घसरत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे आजही मागील खरीप हंगामातील हजारो क्विंटल सोयाबीन आणि कापूस पडून आहे. दरात उसळी येऊन हातात दोन पैसे अधिक पडतील, या आशेवर शेतकरी असताना दरात घसरणीला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना गरज असूनही हा माल विकता येत नसल्याचे चित्र आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनचे दर ४ हजार ते ४ हजार तीनशे रुपयांवर होते. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. खरीप हंगामात सुरुवातीला हेच दर पाच हजाराच्या पुढे होते. शेतमाल साठवूनदेखील शेतकऱ्यांना आज क्विंटलमागे एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

कापसाच्या दरातही मोठी नरमाई दिसून येत आहे. कापूस काढणी हंगामाच्या दरम्यान कापसाला प्रतिक्विंटल आठ हजाराच्या दरम्यान दर मिळत होता. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील, या आशेने कापूस साठवून ठेवला. मात्र, साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरीही द रात घट झाल्याने घोर निराशा आली आहे. सध्या कापसाचे दर हे साडेसहा हजारदरम्यान इतके खाली घसरले आहेत.

माझ्याकडे २५ क्चिटल सोयाबीन पडून आहे. पीक काढतेवेळी सोयाबीन सहा हजाराच्या पुढे जाईल, असा अंदाज बांधला होता. मात्र, सोयाबीनचे सध्याचे दर हमीभावापेक्षा खाली म्हणजे चार हजारांवर आल्याने हा अंदाजही फोल ठरला, किफायतशीर दर मिळण्यासाठी केंद्राने सोयापेंडची आयात थांबून सोयाबीन निर्यात करावी, तरच शेतकरी टिकेल. - गोरक्षनाथ दारकुंडे, शेतकरी, बेलपिपळगाव, ता. नेवासा

मी ३० क्विंटल कापूस साठवला होता, कापूस काढतेवेळी साडेसात हजाराचा दर होता. दरात वाढ होईल, या आशेवर कापूस साठवला. मात्र, दरात सतत चढ-उतार सुरू असल्याने जानेवारीत कापसाची पावणे सात हजार क्चिटलने विक्री केली. वजनात एक ते दीड क्चिटलची घट आली. - मोहन गवळी, शेतकरी, निभारी, ता. नेवासा

लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकार सोयापेंड आणि खाद्यतेलाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी माल आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सध्या सोयाबीन हमीभावापेक्षाही कमी दराने विकली जात असून, कायद्याचे कुठेही पालन होताना दिसत नाही. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. - हरिभाऊ तुवर, जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :मार्केट यार्डबाजारशेतकरीसोयाबीनकापूस