Join us

तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत 'सीसीआय'चे कापूस केंद्र सुरू, पहिल्याच दिवशी झाली एवढी खरेदी..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:06 AM

शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस पेराची नोंद नसेल तर येणार अडचण..

हिंगोली  शहराजवळील लिंबाळा मक्ता भागात तब्बल १३ वर्षांनंतर सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी या केंद्रावर ३५७ क्विंटल ४० किलो कापसाची आवक झाली होती. या कापसाला ६ हजार ९२० रुपये भाव मिळाला.

जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु अपेक्षित बाजारपेठ मिळत नसल्याने कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यातच हिंगोलीतील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मागील १३ वर्षांपासून बंद होते. हे केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर अखेर मुहूर्त मिळाला आणि १२ फेब्रुवारीपासून केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, राजू खुराणा, बाजार समितीचे सचिव नारायण पाटील, संतोष टेकाळे, सावरमल अग्रवाल, केंद्रचालक उमेश दाबेराव, वैभव लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले औंढा नागनाथ तालुक्यातील सावंगी येथील शेतकरी अरुण बाबूराव मस्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एकरी १२ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा...

सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर एकरी १२ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर एका एकरातच कापसाचा पेरा नोंद केलेला असेल आणि कापसाचे उत्पादन १२ क्विंटलपेक्षा अधिक असेल, तर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.सातबारावर कापूस पेराची नोंद आवश्यक...

कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर कापसाचा पेरा नोंदविलेला असेल, तरच केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस पेराची नोंद नाही. त्यांना अडचण येणार आहे, तसेच शेतकऱ्याचे आधार लिंक असणेही आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.पेरा नोंदीचा प्रश्न मांडला खासदारांकडे...

■ सातबारावर कापूस पेराची नोंद असेल तरच सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे.

■ पेराची नोंद नसेल तर कापूस घेतला जाणार नाही. हा प्रश्न केंद्राच्या उ‌द्घाटनप्रसंगी खा. हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडला.

■ त्यावर खा, पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत खरेदी केंद्रावर महसूल प्रशासनाचा एक अधिकारी नियुक्त करून त्या ठिकाणी सातबारावर हस्तलिखित पेरा नोंद करण्यात यावी, असे सांगितले.

■ तसेच केंद्र संचालकांनाही हस्तलिखित पेरा नोंद केलेला असेल, तरीही कापूस खरेदी करावा, अशा सूचना केल्या.

टॅग्स :कापूसबाजारहिंगोली