cotton collection center :
यवतमाळ : जिल्ह्यातील १४ कापूस संकलन केंद्रांवर सीसीआय कापूस खरेदी करणार आहे. तूर्त बाजारात सॅम्पल म्हणून येणारा कापूस अधिक ओलावा असणारा आहे. यामुळे सीसीआयने कापूस खरेदीचा मुहूर्त तूर्त काढलेलाच नाही.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला मात्र प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील राळेगाव, खैरी, पांढरकवडा, मुकुटबन, वणी, शिंदोला, यवतमाळ, कळंब, घाटंजी, दारव्हा, नेर, दिग्रस, महागाव या १४ केंद्रावर सीसीआयने कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील या १४ केंद्रांवर प्रारंभी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया होणार आहे. यानंतरच कापसाची खरेदी होणार आहे. यासाठी केंद्रावर कापूस खरेदी करण्यापूर्वी कापसाचा ओलावा तपासावा लागणार आहे. यात ८ टक्क्यांपेक्षा कमी ओलावा असेल तरच कापसाची खरेदी करता येणार आहे.
सध्या बाजारात येणारा कापूस ८ टक्क्यांपेक्षा अधिक ओलावा असणारा आहे. यातून केवळ ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया केली जात आहे. यात यवतमाळ केंद्रावर ३, राळेगाव केंद्रावर २, घाटंजी ५, वणीमध्ये ७५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
नोंदणी केल्यानंतरच योग्य पद्धतीचा कापूस संकलन केंद्रावर खरेदी केला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात कापसाची खरेदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्विंटलमागे एक हजाराची तफावत
कापूस खरेदी केंद्रावर ७ हजार ५२१ रूपये क्विंटलचा हमी दर आहे. खासगी केंद्रावर कापसाला ६ हजार ५०० रुपयांचा सरासरी दर मिळत आहे.
शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
कापूस खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्र सुरू कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे. मात्र, हे केंद्र कधी सुरू होतील याची अधिकृत वाच्यता करण्यासाठी कुणीही
तयार नाही. यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकले आहेत.