देशात कापसाचे उत्पादन सातत्याने घटत असून, वापर व मागणी वाढत आहे. तुलनेत कापसाच्या दरात मात्र तेजी दिसून येत नाही. दरवर्षी उत्पादन घटूनही कापसाचा क्लोसिंग स्टॉक (शिल्लक गाठी) ४० ते ७० लाख गाठींचा दाखविला जातो. शिवाय, टेक्सटाइल लॉबीच्या दबावामुळे रुईच्या निर्यातीऐवजी आयातीवर अधिक भर दिला जातो. हा प्रकार कापसाचे दर पाडण्यासाठी केला जातो, अशी माहिती शेतमाल बाजारतज्ज्ञांनी दिली.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. फटका बसला तरी शेतकऱ्यांनी आटापिटा करून कपाशी जगविली. सध्या परिसरात अनेक ठिकाणी कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. रविवारी काही शेतकऱ्यांनी वेचलेला नवीन कापूस बाजारात विक्रीसाठी आणला होता. २०२२-२३ मध्ये उत्पादन घटल्याने कापसाला नऊ हजारांच्या दराची अपेक्षा होती. मात्र, ७,५०० रुपये दर मिळाला. २०२१-२२ मध्ये कापसाचा ओपनिंग स्टॉक ७१.८४ लाख, तर मागणी ३६४.६६ लाख गाठींची दाखवून दर दबावात आणले होते.
सीएआयची आकडेवारी चुकीची असली तरी टेक्सटाइल लॉबी त्यावर विश्वास ठेवते. देशात पुरेसा कापूस शिल्लक आहे, असे समजून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करते. यात यश न आल्यास ही लॉबी केंद्रावर दबाव निर्माण करून आठ ते दहा लाख गाठी आयात करून २०० लाख गाठींचे दर पाडते, असे तज्ज्ञ सांगतात.